नैसर्गिक आपत्तीचा चीन, भारताला मोठा फटका!

Read Time:5 Minute, 10 Second

नवी दिल्ली : जागतिक हवामान संस्था यांनी २०२० वर्षासाठीचा जागतिक हवामानातील बदलांचा आढावा घेणारा अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये जागतिक पातळीवर तापमानात झालेली वाढ, हरितगृह वायूचे वाढलेले प्रमाण आणि यामुळे जगावर झालेले परिणाम याबाबत भाष्य केले आहे. यामध्ये आशियामध्ये झालेल्या घडामोडींचा विशेष उल्लेख केला आहे. जागतिक हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका हा आशियातील देशांना बसल्याचे अहवालात नमूद केले आहे.

जागतिक हवामान संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर झालेल्या हवामानातील बदलांचा सर्वात मोठा फटका हा चीन आणि भारताला बसला आहे. विविध स्वरूपाची चक्रीवादळे, अतिवृष्टी, यामुळे उद्भवलेली पूर परिस्थिती, याविरोधातील परिस्थिती म्हणजे दुष्काळ यामुळे जगात विशेषत: आशियाला २०२० मध्ये अक्षरश: झोडपून काढले. यामुळे पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, अनेकांचा बळी गेला. चीनमध्ये वादळाचा मोठा फटका बसला. एवढेच काय, तर भारतात तर एकानंतर एक वादळाचे तडाखे बसले आणि मोठ्या प्रमाणात हानी झाली. अर्थात, भारताला चक्रीवादळ, अतिवृष्टीचा मोठा फटका बसला.

जगात विशेषत: आशियात आलेल्या नैसर्गिक आपत्तीला, संकटांना जागतिक पातळीवर तापमानात झालेली वाढ कारणीभूत असल्याचे जागतिक हवामान संस्थेने स्पष्ट केले आहे. अर्थात, हरितगृह वायूचे वाढलेले प्रमाण कारणीभूत ठरले आहे. २०२० मध्ये जगात टाळेबंदी होती, कोरोना महामारी होती. असे असतानादेखील हरितगृह वायूचे प्रमाण वाढल्याचे अहवालात सांगितले आहे. यामुळे गेल्या ४० वर्षातील सर्वात जास्त सरासरी तापमान राहिलेले वर्ष म्हणून २०२० या वर्षाची ओळख झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. जागतिक पातळीवर दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब असून, हा मुद्दा देशासाठीच नाही, तर जगासाठी चिंतेचा आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात निसर्गाचे संतुलन कसे राखता येईल, यादृष्टीने जागतिक पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी सर्वच देशांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने आयोजित जागतिक हवामान बदल परिषदला जेमतेम एक आठवडा असताना जागतिक हवामान संस्थेने २०२० चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आगामी परिषदेत यावर गांभीर्याने मंथन होण्याची शक्यता आहे. विशेषत: आशियाई देशांनादेखील आता अलर्ट राहावे लागणार आहे. कारण नैसर्गिक आपत्तीतून फार मोठी हानी सहन करावी लागत आहे. त्यासाठी उपाययोजनांवर अधिक भर देण्याची गरज आहे.

२०२० मध्ये भारताचे तब्बल ८७ अब्ज डॉलर्सचे नुकसान
जागतिक हवामान संस्थेच्या अहवालानुसार भारताला २०२० मध्ये अंदाजे ८७ अब्ज डॉलर्सचा म्हणजेच सुमारे ६५,३५२ कोटी रुपयांचा फटका बसला आहे, तर सर्वाधिक फटका चीनला बसला असून, त्यांचे सुमारे २३७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. याशिवाय जपानला ८३, दक्षिण कोरियाला २४, पाकिस्तानला १५ तर थायलंडला १२, बांगलादेशला ११ अब्ज डॉलर्सचा फटका बसला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जागतिक परिषदेत होऊ शकते मंथन
संयुक्त राष्ट्राची ‘जागतिक हवामान बदल’ याबाबतची एक मोठी परिषद स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे पुढील आठवड्यात होत आहे. जागतिक पातळीवरच्या हवामान बदलाबाबत साधकबाधक चर्चा या परिषदेत होणार आहे. अर्थात, हवामान बदलाबाबत नवीन लक्ष्य निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

8 − two =