नेत्यांच्या फुकट आश्वासनांना बसणार ‘सर्वोच्च’ आळा?

Read Time:3 Minute, 38 Second

नवी दिल्ली : निवडणुकांच्या आधी मोफत सुविधा देणा-या किंवा तशी आश्वासने देणा-या राजकीय पक्षांना आता चांगलाच फटका बसणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. एका जनहित याचिकेला दिलेल्या प्रतिसादात सर्वोच्च न्यायालयाने मोफत सुविधांचे आश्वासन देणा-या पक्षांवर कारवाई करण्याबद्दलच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने मागवल्या आहेत. यामुळे आता फुकट आश्वासने देणा-या पक्षांवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण आणि न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा व हिमा कोहली यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. निवडणुकीपूर्वी मोफत सुविधांची आश्वासने देणा-या पक्षांची निवडणूक चिन्ह जप्त करावी की त्यांच्या पक्षाची नोंदणी रद्द करावी याबद्दलची मतं या खंडपीठाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून मागवली आहेत. हा एक गंभीर मुद्दा आहे आणि अशा मोफत सुविधांचे बजेट हे निर्धारित बजेटच्या बाहेर जाते. हा भ्रष्टाचाराचा प्रकार नसला तरी त्यामुळे एक असमानता निर्माण होते, असे या खंडपीठाचे म्हणणे आहे.

आप अडचणीत?
भाजपा नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये आम आदमी पक्षाने पंजाब निवडणुकांपूर्वी १८ वर्षांच्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला १००० रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचा उल्लेख आहे. तसेच, महिलांना भुलविण्यासाठी शिरोमणी अकाली दलाने २००० रुपये देण्याचे केलेले आश्वासन, काँग्रेसच्याही भरघोस आश्वासनांची उदाहरणे देण्यात आली आहे. काँग्रेसने प्रत्येक महिलेला प्रती महिना २००० रुपये, प्रत्येक गृहिणीला वर्षाला ८ गॅस सिलेंडर, महाविद्यालयीन तरुणींना स्कुटी, १२ वी पास झालेल्या मुलींना २० हजार, १० वी पास झालेल्या मुलीला १५ हजार तर आठवी आणि पाचवी इयत्ता पास झालेल्या मुलींना प्रत्येकी १० हजार आणि ५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

यूपीत काँग्रेसचे आश्वासने
या याचिकेत नमूद करण्यात आले आहे की उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने १२ वीतल्या प्रत्येक मुलीला स्मार्टफोन, पदवीचे शिक्षण घेणा-या मुलींना स्कुटी, मुली आणि महिलांसाठी सार्वजनिक वाहनांतून मोफत प्रवास, गृहिणींना वर्षाला ८ गॅस सिलिंडर मोफत आणि प्रत्येक परिवाराला १० लाखांपर्यंतची मोफत वैद्यकीय सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

11 + 5 =