
नीरजने केला संस्मरणीय खेळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
नवी दिल्ली : नीरज चोप्राने आज संस्मरणीय खेळ केला. युवा नीरजने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. नीरजच्या संयमाचे, धैर्याचे आणि अतुलनीय प्रदर्शनाचे कौतुकच, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे त्यांनी थेट नीरज चोप्राशी संवाद साधून त्याचे अभिनंदन केले.
छोरे ने कमाल कर दिया : खट्टर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले, छोरे ने कमाल कर दिया.. अपेक्षेनुसार नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळाले. त्यांना आता ठरल्यानुसार ६ कोटी रुपयांचे बक्षीस दिल जाईल. हरियाणामध्ये सेंट्रल फॉर एक्सलन्स अकादमी बनवली जाईल. त्याचे हेड नीरज चोप्राला केले जाईल.
नीरजच्या गावात जल्लोष
नीरज मूळचा हरियाणाच्या पानिपतचा आहे. संपूर्ण कुटुंब ऑलिम्पिकमधील त्याचा सामना पाहत होते. नीरज जिंकताच त्याच्या घरी जल्लोष सुरू झाला. तेथे लोकांचा ओघ वाढला आणि मिठाई वाटप सुरू झाले. यावेळी वडील सतीशकुमार यांनी सांगितले की, प्रतिकूल पस्थितीत नीरजने हे यश मिळवले आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे. आमच्या भागात क्रीडा सुविधांचा अभाव आहे. तो आपल्या खेळांसाठी घरापासून १५-१६ किमी दूर प्रवास करून जात होता.
सुनील गावस्करांनी वाटली जिलेबी
नॉटिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत समालोचन करताना सुनील गावस्करांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले. सामन्यादरम्यान नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळतानाचा सोहळा प्रसारित करण्यात आला. हे पाहून सुनील गावस्करांच्या आनंदाला सीमा उरली नाही. ‘मेरे देश की धरती’ हे गाणे गात ते नाचतानाही दिसले. यासोबतच त्यांनी स्टुडिओमध्ये जिलब्यांचे वाटपही केले.