नांदेड हल्लाबोल प्रकरणी ४०० जणांवर गुन्हा

Read Time:3 Minute, 6 Second

कोरोनाच्या संकटामुळे नांदेड जिल्ह्यात संचारबंदी असतानाही धुलिवंदनाच्या दिवशी नियमांचे उल्लंघन करीत सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने शहरात हल्लाबोल मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी ही मिरवणूक रोखण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी या मिरवणुकीत सहभागी झालेल्या काही तरुणांनी थेट पोलिसांवरच तलवारीने हल्लाबोल केला. यात ७ पोलिस कर्मचारी जखमी झाले, तर पोलिसांच्या ८ वाहनांची तोडफोड केली. तसेच काही पोलिस गंभीर जखमी झाले असून, पोलिस अधीक्षकदेखील सुदैवाने थोडक्यात बचावले. या प्रकरणी १८ जणांना ताब्यात घेतले असून ४०० जणांविरोधात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहरात दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने हल्लाबोल मिरवणूक काढण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाचे संकट आणि जिल्ह्यातील संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर या मिरवणुकीला बंदी घातली होती. तरीही सोमवारी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. ही मिरवणूक रोखण्यासाठी पोलिस गेले, तेव्हा पोलिस पथकावर तलवारी, दगड आणि दांड्यांनी हल्ला केला. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक (डीआयजी) निसार तांबोळी म्हणाले की, सोमवारी सायंकाळी ४ वाजता निशान साहिब यांना गुरुद्वारा गेटवर आणण्यात आले. पोलिसांनी हल्लाबोल मिरवणुकीला नकार दिल्यावर शीख तरुणांनी वाद घातला आणि अचानक ४०० हून अधिक लोक हातात शस्त्रे घेऊन पोलिसांवर तुटून पडले. या हल्ल्यात जखमी झालेल्या कॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात ४०० हून अधिक लोकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३२४, १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लेखोरांवर कठोर कारवाई
पोलिसानंवर हल्ला करणा-याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असून कोणीचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × four =