नांदेड, बीडसह लातूर जिल्ह्यात दमदार हजेरी

Read Time:4 Minute, 59 Second

निलंगा : औरादला २ तासांत १४५ मि.मी. पाऊस,

वीज पडून एकाचा मृत्यू, २ म्हशी दगावल्या
लातूर/नांदेड : मराठवाड्यात औरंगाबाद, जालन्यासह नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील ब-याच भागात गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा तालुक्यात सायंकाळी दमदार पाऊस पडला. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे तर तब्बल १४५ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच बीड जिल्ह्यातही माजलगाव, वडवणी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. याशिवाय नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. त्यात भोकर तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यात माजलगाव येथील पद्मावती नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. पुराचे पाणी दगडी पुलावरून वाहत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वडवणी तालुक्यातदेखील मुसळधार पाऊस झाला असून, लऊळ येथील नदीला पूर आला. तसेच इतर भागातही पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातही गुरुवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह जिल्हा आणि शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, भोकर तालुक्यात पिंपळढव येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली असून, मराठवाड्यात ब-याच भागात दमदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

लातूर जिल्ह्यातही गुरुवारी दुपारनंतर निलंगा, औसा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. निलंगा शहरासह तालुक्यात सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अक्षरश: रस्त्याला तलावाचे स्वरुप आले. नाले, गटारी, रस्ते तुडुंब भरुन वाहू लागल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. निलंगा-औराद रस्त्यावर अटलवाक जवळ रस्त्यावरील पाणी दुकानात शिरले. रस्त्याला तलावाचे रुप आले. दरम्यान औराद शहाजानी येथे ढगफुटी होऊन दोन तासात १४५ मीमी पाऊस झाला असल्याची औराद हवामान केंद्रात नोंद झाली असल्याचे मुकरम नाईकवाडे यांनी सांगितले. दरम्यान, या पावसात दापका येथील बाबूराव खंडू सुरवसे (५०) यांच्या शेतात वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. तसेच आनंदवाडी ( शि.को.) येथील शेतकरी बालाजी गंगाराम शिंदे यांची एक म्हैस व दगडवाडी येथील विनायक रामा भोसले यांची एक म्हैस दगावल्या.

वीज पडून दोघांचा मृत्यू
भोकर, निलंगा तालुक्यात प्रत्येकी १ बळी
नांदेड जिल्ह्यात एक महिला, तर निलंगा तालुक्यात दोन म्हशींसह एका पुरुषाचा गुरुवारी वीज पडून मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पिंपळढव येथे गुरुवारी शेतकरी सुभाष पोले पत्नी व दोन मुलांसह शेतात गेले होते. दुपारी २.२० च्या सुमारास सुभाष पोले, पत्नी ललिता पोले व त्यांची दोन मुले झाडाखाली बसली होती. त्यावेळी वीज कोसळून ललिता सुभाष पोले (४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुभाष पोले गंभीर जखमी झाले. दोन मुले सुदैवाने बचावले. दरम्यान, निलंगा तालुक्यातील दापका येथील बाबूराव खंडू सुरवसे (५०) यांचा मृत्यू झाला. आनंदवाडी आणि दगडवाडी येथील शेतक-यांच्या २ म्हशी दगावल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

one + 7 =