नांदेड जिल्ह्यात ११ क्विंटल गांजा जप्त

Read Time:3 Minute, 28 Second

एनसीबीची कारवाई, नायगाव तालुक्यात मांजरम येथे पकडला ट्रक

नरसीफाटा : विशाखापट्टणम येथून ट्रकमध्ये गांजाच्या गोण्या भरून एक ट्रक जळगावकडे जात असल्याची माहिती मुबंई येथील एनसीबीच्या पथकाला मिळाली. त्यावरून एनसीबीच्या पथकाने सदरील ट्रकचा तेलंगणामधून पाठलाग करत नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील माजंरम येथे गांजाचा ट्रक सोमवारी पहाटे पकडला आणि तब्बल ११ क्विंटलपेक्षा जास्त वजनाचा गांजा पकडला. एनसीबीच्या या धाडसी कारवाईने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली.
तामिळनाडूमधील विशाखापट्टणम येथून ट्रक क्र.एम.एच.२६ ए.डी.२१६५ मध्ये जवळपास ११ क्विंटलच्या वर गोण्या गांजा भरून महाराष्ट्रातील जळगावकडे जात असल्याची खबर मुबंई येथील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पथकाला मिळाली. सदर पथक रविवारी रात्री तेलंगणामध्ये पोहोचले. त्यानंतर या ट्रकवर पाळत ठेवण्यात आली. या ट्रकचा सोमवारी पहाटेच्या सुमारास पथकाने पाठलाग करून नायगाव तालुक्यातील माजंरम येथे गांजासह ट्रक पकडला. या ट्रकमध्ये २० किलोचे ४४ तर २४ किलोचे ५ असे एकूण जवळपास ४० पोत्यांतील ११ क्विंटलवर गांजा जप्त करण्यात आला. सदर गांजाची किंमत ११ कोटीच्या वर असल्याचे सांगण्यात आले.
सदर कारवाई सोमवारी पहाटे च्या सुमारास झाली. पण गांजाचे वजन करून सविस्तर पंचनामा करण्याचे काम सोमवारी उशिरापर्यंत सुरूच होते. सदर ट्रकधारक हा महाराष्ट्रात एन्ट्री करताच मुख्य रस्ते सोडून आडमार्गाने प्रवास सुरू होता. तसेच बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात बंदी असलेला गांजा, गुटखा मोठ्या प्रमाणात येत आहे. मात्र, याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर एनसीबीच्या कारवाईला विशेष महत्त्व आहे.
मुबंई एनसीबीचे अमोल मोरे, सुधाकर शिंदे, संजय गवळी, प्रमोद मोरे, कृष्णा पारमदरेकर आदींनी ही कारवाई केली. या धाडशी कारवाईत ट्रक चालकासह अन्य एक असे दोन आरोपी व गांजासह ट्रक ताब्यात घेतला. मुबंई एनसीबीने नायगाव तालुक्यात मोठी कारवाई केल्याने नायगावसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईत ट्रक चालक व अन्य एक असे दोन आरोपी ताब्यात असले तरी अजून किती जणावर कारवाई येणार, हे येणाºया काळात स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × five =