नांदेडची वाटचाल बिहारच्या मार्गावर

Read Time:4 Minute, 29 Second

नांदेड : प्रतिनिधी

कुख्यात गुंडांमुळे नामवंत व्यक्ती व व्यापा-यांची सुरक्षा धोक्यात आली असूनपोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. यामुळेच यापूर्वी अनेक व्यापा-यांवर जीवघेणे हल्ले झाले. आता संजय बियाणी सारख्या प्रसिद्ध व्यापा-याची भरदिवसा हत्त्या झाली आहे. यावरून नांदेडची वाटचाल बिहारच्या मार्गावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा गंभीर आरोप हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केला आहे.

या अनुषंगाने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी संताप व्यक्त करीत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर आरोप केले. यावेळी बोलताना वानखेडे म्हणाले की, शहरासह नांदेड जिल्ह्यात यापूर्वी छोटे-मोठे गुन्हे घडत होते. मात्र आता मोठे गुन्हेही सहजरित्या होत आहेत. जागोजागी जुगार, पत्त्यांचे क्लब, मटका चालत आहेत. अवैधरित्या दारू व गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. यासाठी पोलिसांची अनेक ठिकाणी गुन्हेगारांना मूकसंमती मिळत आहे. नामवंत, मोठे व्यापारी, डॉक्टर, बिल्डर यांना खंडणीसाठी त्रास दिला जात आहे. खंडणी नाही दिली तर त्यांच्यावर हल्ले होत आहेत. या पद्धतीने बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्याच घरापुढे भरदिवसा हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. यामुळे नागरिकांसह व्यापा-यांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे. एवढया मोठ्या घटना घडत असताना पोलिसांची धडक कारवाई होण्याऐवजी डोळेझाक होत आहे, यामुळे गुन्हेगारांचे बळ वाढत आहे.

तीन वर्षांपूर्वी बियाणी यांना खंडणी मागण्यात आली होती. तेव्हा शिताफिने त्यांनी स्वत:चा जीव वाचविला. यानंतर पोलिसांनी बियाणी यांना सुरक्षा पुरविली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वीच काढून घेण्यात आली. सुरक्षारक्षक काढून घेतल्याच्या काही दिवसांत बियाणी यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली. पोलिस अधीक्षक म्हणून प्रमोदकुमार शेवाळे यांनी नांदेडचा पदभार घेतल्यापासून नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत. यात बियाणी यांची हत्त्या आणि व्यापा-यांवर सतत होणारे हल्ले यामुळे नांदेडची वाटचाल आता बिहारकडे होत असल्याचा अनुभव येत आहे, असा आरोप सुभाष वानखेडे यांनी केला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यातही सत्ताधारी नेते, आमदार यांना पाहिजे तेच अधिकारी नियुक्त केले जात आहेत. यामुळे अवेैध ध्ांद्यांना बळ मिळत असून सामान्य नागरिकांना पोलिसांकडून न्याय मिळणे अवघड झाले आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद व्हावेत, गुन्हेगारावर वचक रहावा आणि नांदेड जिल्ह्यास आयपीएस अधिकारी नियुक्त करावा, आदी मागण्यांसंदर्भांत आपण पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत, असेही माजी खा.सुभाष वानखेडे यांनी ‘एकमत’शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × one =