
नववर्ष जल्लोष घरातच
मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात आता ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटामुळे चिंता निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारला पुन्हा निर्बंध लागू करावे लागत आहेत. महाराष्ट्रातही रुग्णवाढीचा दर वाढल्याने सरकारने खबरदारीच्या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनसाठीची नियमावली जारी केली. कोरोना संक्रमणाची स्थिती लक्षात घेता ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणाने करावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
राज्यात २५ डिसेंबरपासूनच रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात यावे आणि उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात ओमिक्रॉनप्रमाणे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यातच कोरोनाचे रुग्णही आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. एकट्या मुंबईतच आज अडीच हजारांच्या वर रुग्णवाढ झाली. तसेच राज्यातही रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.
मार्गदर्शक सूचना
ळ ३१ डिसेंबर रोजी आणि १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडू नका. घरीच साधेपणाने नवीन वर्षाचे स्वागत करा
२५ डिसेंबरपासून रात्री ९ वाजल्यापासून ते पहाटे ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या स्वागताकरिता आयोजित कार्यक्रमांसाठी बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना उपलब्ध आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपर्यंत मर्यादित परवानगी असेल.
कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी नको. सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी घराबाहेर पडणे टाळावे
३१ डिसेंबर रोजी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाट्यांवर नागरिकांनी गर्दी करू नये.
नववर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. मिरवणुका काढू नयेत.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करावे.