
नंदी दूध पित असल्याची अफवा, मंदिरात गर्दी, पोलिसांना पाचारण
औरंगाबाद : महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दूध सेवन करत असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरल्याने आज (शनिवारी) संध्याकाळच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. अचानक उसळलेल्या गर्दीला आवर घालण्यासाठी अखेरीस पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावे लागले.
महादेवाच्या मंदिरावर नंदी दुधाचे आणि पाण्याचे सेवन करीत आहे, अशी अफवा तालुकाभर पसरली होती. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील सर्वच महादेवाच्या मंदिरावर रात्री उशिरापर्यंत महिलांची गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. पण काही वेळाने ही फक्त अफवा असल्याचे समोर आले. महादेवाच्या मंदिरात नंदी दूध आणि पाणी सेवन करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही वार्ता वा-यासारखी पसरताच महिला दूध, पाणी घेऊन मंदिरात धाव घेऊ लागल्या, काही महिलांनी श्रद्धेपोटी महादेवाच्या नंदीला दूध आणि पाणी वर्ज केले तर काहींनी आमच्या हाताने नंदीने दूध पिल्याचे सांगितल्याने गर्दीत आणखीनच भर पडली होती. वाढती गर्दी लक्षात घेता आमखेडा आणि सोयगाव शहर भागात ऐनवेळी पोलिस बंदोबस्त मंदिर परिसरात तैनात करावा लागला.
अनेक भागात हीच परिस्थिती
सोयगावप्रमाणेच औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशीच काही परिस्थिती पाहायला मिळाली. वाळूज आणि गंगापूर भागातील अनेक ठिकाणी महादेव मंदिरात महिलांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले, तर ब-याच ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.