धर्मसंसदेत संतांचा संविधानद्रोही फुत्कार

Read Time:11 Minute, 36 Second

उत्तराखंडमधील हरिद्वार येथे १७ ते १९ डिसेंबर रोजी आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे २५ व २६ डिसेंबर २०२१ रोजी हिंदू धर्मसंसदेचे आयोजन केले होते. या दोन्ही हिंदू धर्मसंसद हिंदू धर्माचा प्रचार व प्रसाराचे नियोजन तसेच भविष्यकालीन सुधारणांचा कृति कार्यक्रम आखण्याऐवजी परधर्मीयांच्या विरोधात द्वेषाचा विखार व्यक्त करणा-या ठरल्या. साधू-संतांनी मानवतेचा संदेश देण्याऐवजी धार्मिक तेढ, द्वेष निर्माण करून भारतातील धर्मनिरपेक्षता, लोकशाही व संविधानाच्या सरनाम्याला जाहीर आव्हान दिले. हरिद्वारच्या धर्मसंसदेत कथित साधू-संतांनी आणि ठेकेदारांनी मुस्लिम समुदायाविरोधात गरळ ओकली. गाझियाबाद (उ. प्र.) येथील दासनाच्या शिवशक्ती मंदिरात पुजारी असलेले यती नरसिंहानंद यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा जयजयकार केला. गोडसे आमच्यासाठी प्रात:वंदनीय आहेत. पूजनीय आहे. गोडसे हे आमचे दैवत आहेत. गोडसेमुळेच आम्ही जिवंत आहोत अशी अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदूंना उत्तेजित करणारी वक्तव्ये केली. मुस्लिम समुदायाबद्दल नरसिंहानंद महाराज यांनी याआधीही वादग्रस्त विधाने केली आहेत. अशा या महाराजाला गेल्या ऑक्टोबरमध्ये जुना आखाडाचे महामंडलेश्वर पद बहाल केले आहे.

हरिद्वारच्या धर्मसंसदेत हिंदू रक्षा समितीचे अध्यक्ष प्रबोधानंद गिरी यांनी देशातील २० कोटी मुस्लिमांचा शिरच्छेद करण्याचे जाहीर आवाहन केले. भारतातील पोलिस, नेते, लष्कर व जनतेने हाती शस्त्र घेण्याचे ‘अभियान’ सुरू करावे अशी चिथावणी दिली. याच वेळी साध्वी अन्नपूर्णा यांनी महात्मा गांधी यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतले. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात महात्मा गांधी यांचे कसलेच योगदान नव्हते असे त्या बरळल्या. अन्नपूर्णा या हिंदू महासभेच्या महासचिव आहेत. रायपूरमध्ये झालेल्या धर्मसंसदेत कालिचरण महाराज यांनीही हरिद्वारच्या धर्मसंसदेतील वक्त्यांच्या द्वेषपूर्ण भाषणाची पुनरावृत्ती केली. महात्मा गांधी यांच्या संदर्भात त्यांनी अत्यंत जहरी शब्दांचा वापर केला व गांधींची हत्या केल्याबद्दल नथुराम गोडसेचे हात जोडून गुणगान केले. या लोकांच्या वक्तव्याची भाषा जशीच्या तशी येथे लिहिणे मनाला पटत नाही. लोकशाही संविधान आणि धर्मनिरपेक्षतेला उघड आव्हान देणारे व गांधींच्या पासंगालाही न पुरणारे हे साधू-संत आता असे का चेकाळले? त्यांचा बोलविता धनी कोण? त्यांचा हेतू कोणता या संदर्भात विचार करणे गरजेचे आहे. रायपूरच्या धर्मसंसदेत भावना भडकवणारे वक्तव्य केल्याबद्दल छत्तीसगड पोलिसांनी कालिचरणच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथे अटक केली.

दुसरीकडे हरिद्वारच्या धर्मसंसदेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल वसिम रिझवी ऊर्फ जितेंद्र नारायण स्वामी, साध्वी अन्नपूर्णा, धर्मदास, सिंधू सागर व आयोजक यती नरसिंहानंद यांच्यावर उत्तराखंड पोलिसांनी गुन्हा तर नोंद केला परंतु आरोपींना अटक केली नाही. परंतु या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी (विशेष तपासणी पथक) नियुक्त करण्याचा फार्स केला आहे. कालिचरणला अटक करण्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दाखवलेली तत्परता उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे का दाखवत नाहीत? एसआयटीच्या नावाखाली आरोपींना मोकळे सोडण्यात धामी का धजावतात? बघेल हे काँग्रेसचे तर धामी हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक व आगलावू वक्तव्य करणारी संत मंडळी यांची वैचारिक व सैद्धांतिक जातकुळी सारखीच आहे. जेव्हा राजकीय सत्ता धोक्यात येते तेव्हा बहुसंख्य हिंदू विरुद्ध अल्पसंख्याक मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून, हिंदूंचे धु्रवीकरण करून राजकीय सत्तेवरची मांड मजबूत करण्याचा प्रयत्न याआधी संघपरिवारातील राजकीय पक्ष व संघटनांनी अनेकदा केला आहे. म्हणून तर आज केंद्रात सत्तेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे मंत्री, नेते धर्मसंसदेतील फुटीरतावादी वक्तव्यावर मतलबी मौन बाळगून आहेत. ते कसे बोलतील?

हरिद्वार आणि रायपूरच्या धर्मसंसदेला साधू-संतांच्या आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक वक्तव्याला उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांत लवकरच होणा-या विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी निश्चित आहे. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार आहे. रोजगार, दारिद्र्यनिर्मूलन, आरोग्य, शिक्षण, क्षेत्रात केंद्रातील व विविध राज्यांच्या भाजप सरकारांना सपशेल अपयश आले आहे. गेल्या एप्रिल महिन्यात केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये भाजपला दयनीय पराभवाला सामोरे जावे लागले. आसाम व पुद्दुच्चेरीमध्ये बहुमतासाठी अन्य पक्षांना गोंजारावे लागले. या पाच राज्यांच्या विधानसभांतील एकूण ८२४ जागांपैकी भाजपला केवळ १५२ जागा मिळाल्या आहेत. हे निकाल भाजपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावणारे आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपला उत्तर प्रदेश व उत्तराखंडची सत्ता टिकवून ठेवणे जिकिरीचे झाले आहे. म्हणून भाजपने सत्तेसाठी अखेरचा उपाय म्हणून बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्याक या मतलबी वादाला फुंकर घातली आहे. साधू-संत हे केवळ ‘हाकारे’ आहेत, खरे ‘शिकारी’ मोदी-शहा-योगी आहेत.

राष्ट्रीय एकात्मतेला धर्मांधतेचे आव्हान !
हरिद्वार आणि रायपूरच्या धर्मसंसदेत स्वत:ला हिंदू धर्माचे ठेकेदार समजणा-या साधू-संतांनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाविरोधात बहुसंख्याक हिंदूंना हेतूपूर्वक आणि नियोजनबद्ध भडकावण्याची भाषा करणे हे देशात सामाजिक दुही निर्माण करण्याचाच नव्हे तर देशाचे संविधान, लोकशाही प्रणाली, राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षतेलाच उघडपणे आव्हान दिले आहे. हा देश कोण्या एका धर्माची किंवा पंथाची खासगी मालमत्ता नाही. हा देश सर्व धर्म, पंथ व जातींचा आहे. प्रत्येक नागरिकाला भारतीय म्हणून समानतेचे तत्त्व लागू आहे. त्यामुळेच भारताची एकात्मता, अखंडता व देशाचे सार्वभौमत्व टिकून आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारसी, बौद्ध धर्मियांनी लढला व स्वातंत्र्य मिळविणे हा जाज्वल्य व अभिमानास्पद इतिहास विसरणे म्हणजे स्वतंत्र भारत देशाशी कृतघ्नता म्हणावी लागेल. हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारतीयांना समता, स्वातंत्र्य, बंधुभाव व न्याय या मानवी मूल्यांचा अंतर्भाव असलेले जगातील सर्वोत्कृष्ट संविधान बहाल केले आहे. अल्पसंख्याक धर्मीय व जातींना भयमुक्त वातावरणात जीवन जगता यावे, भारतीय म्हणून त्यांना समानतेची वागणूक देणे हे बहुसंख्याकांचे आद्य कर्तव्य आहे, हा संविधानाचा मूलमंत्र आहे. भारतात सध्या भगव्या वस्त्रातील साधू-संतांनी अंगीकारलेला दहशतवाद हा देशाला अराजकतेच्या खाईत लोटणारा व देशाला एकोणविसाव्या शतकात नेणारा आहे. अशा समाजद्रोही, संविधानद्रोही साधू-संतांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोह, सामूहिक कत्तल करण्याची धमकी देणे या सबबीखाली गुन्हे नोंदवून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे. विशेष म्हणजे या कथित साधू-संतांच्या मागे कोणाचा मेंदू आहे याचाही तटस्थ तपास झाला पाहिजे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे संविधानाचे रक्षक आहेत. संविधानाचे मूल्य, उद्दिष्ट कोणत्याही किमतीवर जपणे त्यांचे कर्तव्य आहे. भगव्या वस्त्रातील साधू-संतांचा हा विखारी दहशतवाद देशासाठी घातक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

-रामराव गवळी
लातूर, मोबा. : ९४२३३ ४५७९२

Leave a Reply

Your email address will not be published.

four × five =