देशाला मिळाली आठवी वंदे भारत ट्रेन

हैदराबाद : वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेकडून सेवेत दाखल होणा-या आठवी वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला.
सिकंदराबाद आणि विशाखापट्टणम दरम्यान धावणारी ही वंदे भारत रेल्वे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना जोडेल. यात एकाच वेळी १,१२८ प्रवाशी प्रवास करु शकतील. यात आठव्या वंदे भारत ट्रेनमध्ये १४ एसी चेअर कार आणि दोन एक्जीक्यूटिव एसी चेयर बोगी असतील.
यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी आणि तेलंगाणाचे राज्यपाल टी. सौंदर्यराजन सिकंदराबाद स्टेशनवर उपस्थित होते. सोमवार पासून नियमीत धावणारी ही रेल्वे सुमारे ७०० किमी अंतर पार कलेल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तर तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर ही गाडी थांबेल.
असा करेल प्रवास
रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम- सिकंदराबाद एक्स्प्रेस (२०८३३) सकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी विशाखापट्टणम स्टेशनवरुन रवाना होईल. दुपारी दोन वाजून १५ मिनिटांनी सिकंदराबाद येथे पोहचले. तर सिकंदराबाद – विशाखापट्टणम- एक्स्प्रेस (२०८३४) तीन वाजता सिकंदराबाद स्थानकातून रवाना होईल आणि रात्री साडेअकरा वाजता विशाखापट्टणम येथे पोहचेल.