August 19, 2022

देशात २१ नव्या सैनिकी शाळा

Read Time:3 Minute, 38 Second

पुणे : संरक्षण मंत्रालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता देशात २१ नव्या सैनिकी शाळांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नगर येथील पी. डी. डॉ.विखे पाटील सैनिक शाळेचाही समावेश आहे.

स्वयंसेवी अथवा खासगी संस्था तसेच राज्य सरकार यांच्यासोबत भागीदारीच्या माध्यमातून सैनिकी शाळा सुरू होणार आहेत.

देशभरात अशा १०० सैनिकी शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्याचाच भाग म्हणून या नव्या शाळांना परवानगी देण्यात आली आहे. या शाळा सध्या अस्तित्वात असलेल्या सैनिकी शाळांपेक्षा वेगळ्या असतील. सध्याच्या सैनिकी शाळा पूर्णपणे निवासी शाळा आहेत. मात्र, या नव्या शाळांपैकी सात शाळा दिवसभराच्या असतील तर, १४ शाळा निवासी शाळा असतील. त्यांच्या संबंधित शैक्षणिक बोर्डाशी संलग्न असतील, तसेच सैनिक स्कूल सोसायटीच्या आधीन राहून त्यांचे काम सुरू असेल. या सोसायटीने भागीदारीतल्या सैनिकी शाळांसाठी निश्चित केलेल्या नियम-कायद्यांच्या अनुसार त्यांचे कार्यान्वयन चालेल.

मान्यता मिळालेल्या नव्या सैनिकी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया मे महिन्यापासून पासून सुरु होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुस-या फेरीत उर्वरित सैनिकी शाळांसाठी इच्छुक असल्याचे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे.

अशी असेल प्रवेश प्रक्रिया
– इयत्ता सहावीपासून मिळणार प्रवेश
– नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहावीच्या वर्गात ४० टक्के जागा राखीव असतील.
– त्याच शाळेत आधी शिकत असलेल्या आणि आता सैनिकी शाळेत शिकू इच्छिणा-या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ६० टक्क्यांपर्यंतच्या जागा ठेवल्या जातील.
– मात्र, त्यांनाही एक पात्रता परीक्षा द्यावी लागेल.
– अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा-२०२२ साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी वर माहिती दिली जाईल.
– पात्र विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या शाळेत प्रवेश घेण्याकरिता ई-कौन्सिलिंगसाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.
– ज्या विद्यार्थ्यांनी नव्या सैनिकी शाळांमध्ये आधीच नोंदणी केली, त्यांना पात्रता परीक्षेच्या आधारावर प्रवेश दिले जाणार.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × three =

Close