देशात महागाईचा आगडोंब उसळणार

Read Time:5 Minute, 51 Second

नवी दिल्ली : एक तर कोरोनाने जगात उलथापालथ केली. त्याची झळ अस झाली होती. आता कोरोनातून दिलासा मिळत असतानाच आता रशिया-युक्रेन युद्धाने नवे संकट उभे केले आहे. त्यामुळे आता देशात महागाईचा आगडोंब उसळण्याची चिन्हे आहेत. अगोदरच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उच्चांकावर गेले आहेत. त्यामुळे इंधनासह सर्वच मालाच्या किमती वाढण्याची चिन्हे असतानाच आता जवळपास ८०० औषधांच्या किमती वाढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. यासोबतच शेतीसाठी लागणारा रासायनिक खतही महागणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत महागाई उच्चांक गाठेल. यातून सर्वसामान्यांना जगणे महाग होणार आहे.

कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था आणि व्यवहार कोलमडलेले असतानाच आता रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. एक तर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडलेले असल्याने आगामी काळात लवकरच पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर भडकणार आहेत. तसेच खाद्य तेलाचे दरही पुन्हा भडकले आहेत. त्यातच आता येत्या एप्रिल महिन्यापासून जीवनावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार वाढत्या घाऊक महागाईमुळे जवळपास ८०० औषधांच्या किमती वाढणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.

नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन्समधील (एनएलईएम) जवळपास ८०० औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या किमती वाढवल्या जाणार आहेत. गेली अनेक वर्षे या किमती स्थिर होत्या. परंतु महागाईमुळे आता या किमतीत १० टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. घाऊक किंमत निर्देशांकात (डब्ल्यूपीआय) तीव्र वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगण्यात आले. एनईएलएममध्ये सूचीबद्ध औषधांची वार्षिक वाढ डब्ल्यूपीआयच्या आधारावर केली जाते. या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली औषधी अत्यावश्यक औषधांच्या श्रेणीत गणली जाते.

ही औषधी किरकोळ विक्रेत्यांसोबतच सरकारी आरोग्य योजनांमध्येदेखील वापरली जाते. दरम्यान एलईएलएम यादीमधील ही औषधे ताप, संक्रमण, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचा रोग आणि अशक्तपणा यासारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. यामध्ये पॅरासिटामॉल आणि अ‍ॅझिथ्रोमायसिन यांसारख्या प्रतिजैविकांचा समावेश आहे. ही औषधी किरकोळ विक्रीव्यतिरिक्त सरकारच्या अनेक आरोग्य कार्यक्रमांसाठी म्हणजेच योजनांकरिता वापरली जातात. त्यामुळे रुग्णांवरील उपचारही महागणार आहेत. अर्थात, याचा फटका खिशाला बसणार असून, सर्वसामान्यांना आगामी काळात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

एप्रिलपासून औषधांच्या नव्या किमती लागू?
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या (एनपीपीए) अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आंतरिक पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र औषधांच्या किमतीतील बदलांसाठी डब्ल्यूपीआय हा आधार म्हणून घेतला जातो. परिणामी या औषधांवर १ एप्रिल २०२२ पासून नव्या किमती लागू केल्या जातील. त्यामुळे पुढील महिन्यात ही औषधी महागण्याची चिन्हे आहेत.

पेट्रोल १२ रुपयांनी महागणार?
कच्च्या तेलाच्या किमतीने प्रतिबॅरल १२० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या ९ वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे. या आधारावर तेल कंपन्यांना ७ मार्चनंतर इंधनाच्या दरात १२ रुपयांनी वाढ करावी लागणार आहे. यासह पेट्रोल १२१ रुपये प्रतिलिटर होऊ शकते. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती दररोज वाढत आहेत. गुरुवारनंतर, शुक्रवारी थोडीशी घसरण झाली आणि ते प्रतिबॅरल १११ डॉलरवर राहिले. दुसरीकडे देशातील पाच राज्यांतील निवडणुकीचे वातावरण असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, मतदान प्रक्रिया संपताच पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीच्या आधारावर तेल कंपन्यांना किमान १२ रुपयांनी दरात वाढ करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 × four =