August 9, 2022

देशात फक्त ९ तासांत २ कोटी लसींचे डोस

Read Time:2 Minute, 24 Second

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर देशात काल लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे फक्त ९ तासांत देशातील २ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुरू होते. त्यामुळे लसीकरणाचा आकडा आणखी वाढू शकतो.

कोविनवरील आकडेवारीनुसार आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत २ कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले. देशात प्रथमच एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. ऑक्टोबरच्या मध्यमापर्यंत १०० कोटींहून अधिक डोस देण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. यामध्ये पहिला आणि दुस-या डोसचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी दुपारी दीड वाजेपर्यंत १ कोटी लोकांना लस देण्यात आली होती. प्रत्येक सेकंदाला ५२७ पेक्षा जास्त लोकांना लस दिली जात आहे. एका तासाला १९ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले. यावरून लसीकरणाची गती किती असेल, याचा अंदाज येतो.

देशात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची गती वाढली आहे. यापूर्वी २७ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी देशात एक कोटीहून अधिक लोकांना लस देण्यात आली होती. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी देशातील लसीकरण मोहिमेला गती देण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींसाठी ही वाढदिवसाची सर्वोत्तम भेट असणार आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोकांना लसीचा डोस द्यावा, असे निर्देश भाजपने देशभरातील आपल्या युनिट्सना दिले होते. त्यामुळे लसीकरणाचा नवा विक्रम नोंदला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published.

16 − 15 =

Close