देशात दरमहा २५ कोटी लस निर्मितीची क्षमता

Read Time:3 Minute, 8 Second

संसर्गाचा कहर सुरू असताना लसींचा तुटवडा सुरूच आहे. अवघ्या जगाला विविध आजारांवरील ७० टक्के लसींचा पुरवठा करणा-या भारताला आपल्या जनतेसाठी पुरेसा लस पुरवठा करता येत नाही, ही बाब चिंतेची आहे. नॅशनल कोविड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही.के. पॉल यांनी भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचा फॉर्म्युला इतर कंपन्यांशी शेअर करण्यास तयार आहे, असे सांगितले होते. तसे झाल्यास देशात वेगाने लस उत्पादन होऊ शकते.

खरे तर देशात १६ कंपन्यांकडे तात्काळ लस निर्मितीची क्षमता आहे. त्यामुळे केंद्राने आवश्यक परवानगी दिली तर या कंपन्या दरमहा देशात २५ कोटी आणि वर्षाला ३०० कोटी डोस तयार करू शकतात. विशेष म्हणजे फक्त ३ सरकारी कंपन्याच दरमहा ८ कोटी लस तयार करू शकतात. सध्या भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट दरमहा फक्त ७.५ कोटी डोस तयार करत आहेत. विशेष म्हणजे भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन निर्मितीचा फक्त दोन कंपन्यांशीच करार केलेला आहे.

दुस-या कंपन्यांना फॉम्यूला द्यावा
सीसीएमबीचे माजी संचालक डॉ. सी.एच. मोहनराव यांच्या मते लस फॉर्म्युलेशन पेटंट असलेली कंपनी दुस-यांना उत्पादनासाठी फॉर्म्युला देऊ शकते. त्यासाठी त्यांच्याकडे बीएसएल-३ लॅब असावी. हैदराबादेत अशा १५ व पुण्यात ५ पेक्षा जास्त लॅब आहेत. उत्पादनानंतर फॉर्म्युलेशन कंपनी लसीचे मार्केटिंग करते. निर्माता कंपनीला करारानुसार वाटा मिळतो. हा तंत्रज्ञान हस्तांतरण करार आहे. तो भारत बायोटेककडून केला जाऊ शकतो. यासंबंधी वेळीच निर्णय झाल्यास देशात वेगात लस उपलब्ध होऊ शकते.

…तर ७३ कोटी लोकांचेच लसीकरण
सध्याच्या स्थितीनुसार लसीकरणाचा विचार केल्यास पुढील एका वर्षात भारतात १४६ कोटी डोस उपलब्ध होतील, तरीही देशात ७३ कोटी लोकांचेच लसीकरण होऊ शकेल. यातही १६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागेल. खासगी क्षेत्र आणि रुग्णालयांना लसींची आयात करण्यासाठी नव्या निर्मात्यांकडे जावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

10 + 12 =