August 19, 2022

देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ

Read Time:5 Minute, 45 Second

भारतातील पहिल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आज दुपारी केंद्रीय मंत्री सवानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही ऑनलाईन उपस्थित होते. मुंबई ते बेलापूर अशी ही सेवा चालणार आहे. या जलवाहतुकीची अनेकांना प्रतीक्षा होती. आता हा प्रवास सुखकर आणि पर्यावरण पूरक असला तरी स्पीड बोटने प्रवास करण्यासाठी प्रतिप्रवासी तब्बल ८०० ते १२०० रुपये किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे या फेरीच्या उद्घाटनादिवशीच नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

देशात पहिली वॉटर टॅक्सी नवी मुंबईकरांसाठी उपलब्ध झाली. नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी हा प्रवास अत्यंत आरामदायक आणि नयनरम्य असणार आहे. मुंबई ते नवी मुंबई प्रवासाकरिता स्पीड बोट आणि कॅटामरान बोट या दोन सेवा उपलब्ध असतील. यात बेलापूर ते भाऊचा धक्कादरम्यान स्पीड बोटसाठी एकेरी भाडे ८२५ आणि १२१० रुपये मोजावे लागतील, तर कॅटामरन बोटसाठी एकेरी भाडे २९० रुपये असणार आहे. स्पीड बोटीच्या मासिक पासला तर तब्बल १२ हजार १०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे हा प्रवास खिशाला परवडणारा नाही. दरम्यान, याबाबत राज्य सरकार याबाबत काय नवे निर्णय घेणार का? हे पाहावे लागेल.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजचा दिवस महत्वाचा आणि आनंदाचा असून देशातील पहिली वॉटर टॅक्सी महाराष्ट्रात सुरू होत आहे, असे सांगतानाच केंद्रीय मंत्र्यांनी यास प्राधान्य दिले, याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई-ठाणे दरम्यान सुरू झाली. मुंबईतून जी सुरुवात होते, त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते, हे आजवर दिसून आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. समुद्रावर हुकूमत असली पाहिजे या भावनेने छत्रपतींनी कल्याणमध्ये आरमारची बांधणी सुरू केली तेव्हापासूनच या परिसराचे महत्व अधोरेखित झाले. त्यानंतर इंग्रजांनी रेल्वे आणली.

आता एलिफंटाला जाण्यासाठी जलवाहतूक सेवा उपयोगी ठरणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विकासात दळणवळणाची सेवा महत्वाची असून नवी मुंबईला मुंबईशी जोडणारी ही जलवाहतूक सेवा आज सुरू झाली आहे. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, भुयारी रेल्वे यामध्ये आधुनिकीकरणाची कास धरत आज वॉटर टॅक्सी सुरू झाली आहे. समुद्राचा उपयोग फक्त सूर्योदय-सूर्यास्त पाहण्यासाठी नाही. त्याशिवाय उपयोग वाढला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत वाहतुकीचे जाळे विकसित
मुंबई-पुणे रस्ता असेल, मुंबईतील ५५ उड्डाणपूल असतील, सागरी किनारा मार्ग असेल, मुंबई- कोकणाला जोडणारा सागरी मार्ग असेल, शिवडी-न्हावा शेवा मार्ग असेल असे परिवहनाचे जाळे आपण विकसित केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

इतर सेवा अधिक किफायती
नवी मुंबईतून मुंबईत जाण्यासाठी लोकल ट्रेनने १५ ते २० रुपये मोजावे लागतात, तर बेस्ट प्रवासासाठी १५ ते ३५ रुपये मोजावे लागतात. याशिवाय खासगी कार सेवेसाठी ५०० ते ६०० रुपये लागतात. पण या वॉटर टॅक्सीला तर ८०० ते १२०० रुपये लागत असल्याने अर्धा ते पाऊण तास वेळ वाचविण्यासाठी तब्बल ५०० ते हजार रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. शिवाय वॉटर बोटने भाऊच्या धक्क्यावर उतरावं लागणार आणि तिथून पुन्हा प्रवासाठी इतर पर्याय शोधावे लागणार ते वेगळेच. त्यामुळे नाराजीला सुरुवात झाली आहे.

आमदार मंदा म्हात्रे कमी भाड्यासाठी प्रयत्न करणार
मुंबईतून बेलापूरला वेगात पोहोचण्यासाठी वॉटर टॅक्सीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. परंतु इतर सुविधांच्या तुलनेत भाडे अधिक असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे वॉटर टॅक्सीला फारसा प्रतिसाद मिळेल, असे वाटत नाही. तथापि, स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी हे भाडे कमी करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty − 19 =

Close