
देशांतर्गत विमान प्रवास महागणार
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या भडकलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांवर रडण्याची वेळ आली आहे. त्यातच आता देशांतर्गत विमानप्रवासही महागणार आहे. केंद्र सरकारने कमान प्रवासभाड्याची मर्यादा १६ टक्के वाढविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे किमान भाडे १३ ते१६ टक्क्यांनी वाढणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केला आहे. किमान प्रवासभाडे वाढविण्यात आले असले, तरी कमाल प्रवासभाड्याची मर्यादा बदलण्यात आलेली नाही.
प्रवासभाड्याच्या सीमा गेल्या वर्षी २५ मेपासून विमान वाहतुकीला परवानगी देण्यात आल्यानंतर निर्धारित करण्यात आली होती. नवे बदल १ जूनपासून अंमलात येतील. त्यानुसार ४० मिनिटांच्या प्रवासासाठी किमान प्रवासभाडे २ हजार ३०० रुपयांऐवजी २ हजार ६०० रुपये निर्धारित करण्यात आले आहे, तर ४० ते ६० मिनिटांच्या प्रवासासाठी ३ हजार ३०० रुपये किमान प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे.
१ जूनपासून उड्डाणांची संख्या घटणार
कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे गेल्या ३ महिन्यांपासून प्रवासी संख्या घटली. सरकारने १ जूनपासून प्रवासी क्षमता सध्याच्या ८० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर आणली. सरकारच्या निर्देशानुसार उड्डाणांची संख्याही घटविण्यात येणार आहे. त्यामुळे १ जूननंतर तिकिटे रद्द होण्याची शक्यता आहे.
नुकसान झेलणा-या कंपन्यांना दिलासा
प्रवासभाडे वाढविण्यात आल्यामुळे कोरोना महामारीच्या काळात आर्थिक नुकसान सहन करणा-या विमान कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोना संसर्गाच्या देशात आलेल्या लाटेमुळे विमान प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. अशा कंपन्यांना आता दिलासा मिळाला.