June 29, 2022

दुस-या लाटेतही १ कोटी नोक-या गेल्या!

Read Time:5 Minute, 38 Second

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुस-या लाटेनेही अर्थव्यवस्थेला फार मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारने लॉकडाउनचा निर्णय टाळला असला, तरी जवळपास सगळ््याच राज्यांनी कमी-अधिक प्रमाणात निर्बंध लादले. याचा परिणाम अर्थचक्रावर झाला असून, कोरोनाच्या दुस-या लाटेने तब्बल १ कोटी नोक-यांचा घास घेतला. इतकेच नाही, तर मागील वर्षी कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाल्यापासून देशातील ९७ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नातही घट झाली आहे, अशी माहिती ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी दिली.

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेने देशातील १ लाख ७५ हजार कुटुंबांचा सर्व्हे केला. त्यातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या अभ्यासात सहभागी असलेल्या केवळ ३ टक्केच कुटुंबांनी त्यांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले. याचाच अर्थ कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर ९७ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे, असे व्यास यांनी सांगितले. तसेच ५५ टक्के लोकांनी आर्थिक उत्पन्न कमी झाल्याचे सांगितले, तर ४२ टक्के लोकांनी उत्पन्न आधीइतकेच आहे, असे म्हटले. विशेष म्हणजे महागाईसोबत तुलना केल्यास देशातील ९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न महामारीदरम्यान कमी झाले आहे, असे म्हणावे लागेल, असे व्यास म्हणाले.

पहिल्या लाटेत कोट्यवधी लोकांना नोक-या गमवाव्या लागल्या. पहिल्या लाटेतून जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसरी लाट आली. यातही बेरोजगारी वाढली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे देशावर फार मोठे संकट कोसळल्याचे चित्र आहे. देशात दुस-या लाटेमुळे तब्बल १ कोटींपेक्षा जास्त लोकांच्या नोक-या गेल्या आहेत. लॉकडाउनमधून अर्थव्यवस्था खुली होत असतानाच दुसरी लाट आली. त्यामुळे बेरोजगारीची समस्या पूर्णपणे सुटली नाही. गेल्या वर्षी म्हणजेच मे २०२० मध्ये लॉकडाउनमुळे बेरोजगारीचा दर २३.५ टक्क्यांवर पोहोचला होता. दुसरी लाट आल्यानंतर अनेक राज्यांनी निर्बंध लादले, त्याचाही परिणाम थेट नोक-यावर झाला. एवढेच नव्हे, तर अर्थचक्रही बिघडले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

मे महिन्यात बेरोजगारीचा दर तब्बल १२ टक्क्यांवर
संशोधन संस्थेच्या अभ्यासानुसार बेरोजगारीचा दर मे महिन्यात १२ टक्क्यांवर पोहोचला. एप्रिलमध्ये हा दर ८ टक्के होता. याचाच अर्थ या काळात जवळपास एक कोटी भारतीयांनी आपली नोकरी गमावली. कोरोनाची दुसरी लाट हेच नोकरी जाण्याचे मुख्य कारण असल्याचे त्यात नमूद करण्यात आले.

बेरोजगारांना नोक-या शोधण्यात अडचणी
ज्या लोकांची नोकरी गेली, अशांना नवी नोकरी शोधण्यात ब-याच अडचणी येत आहेत. असंघटित क्षेत्रात वेगाने नोक-या तयार होत जातात. परंतु संघटित क्षेत्रात चांगल्या नोक-या मिळण्यास वेळ लागतो. उल्लेखनीय बाब म्हणजे मागील वर्षी मे महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचा दर २३.५ टक्क्यांवर पोहोचला होता.

सामान्य स्थिती येण्यास वर्षभराचा काळ लागेल
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी बेरोजगारीचा ४ ते ५ टक्के दर हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या मानाने सामान्य मानला जाऊ शकतो. मात्र, गेल्या वर्षी मे महिन्यात हा दर जर २३.५ टक्क्यांवर गेला होता, तर यंदा मे महिन्यात तो दर १२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे स्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल. अर्थात, चांगल्या दर्जाच्या नोकरीच्या संधी निर्माण होण्यास साधारणत: वर्षभराचा कालावधी लागू शकतो, असे व्यास म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × three =

Close