August 19, 2022

दुबार फोटोंच्या थाळी वजा करुनच बिलं दिली जाणार

Read Time:4 Minute, 6 Second

लातूर : एजाज शेख
शिवभोजन थाळी ही राज्य शासनाचे महत्वाकांक्षी योजना आहे. गरीबांना अगदी स्वस्तात पोटभर अन्न मिळावे म्हणून राज्य शासनाने ही योजना सुरु केली. परंतु, शिवभोजन चालक ही योजना राबवित असताना काही त्रुटी समोर आल्या आहेत. एखादा व्यक्ती शिवभोजन थाळीसाठी आल्यास त्याचा फोटो काढणे आवश्यक आहे. दररोज येणा-या लाभार्थ्यांच्या फोटोसह तहसील कार्यालयात बील सादर करणे अपेक्षीत असताना काही शिवभोजन चालक दुबार फोटो काढून बील सादर करीत आहेत. त्यामुळे जे जे दुबार फोटो आहेत त्या सर्व शिवभोजन थाळी वजा करुनच उर्वरीत बील शिवभोजन चालकांना दिले जाणार असल्याचे पत्र जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दि. २ मार्च २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहे.

तहसील कार्यालयांमार्फ त जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे शिवभोजनचे देयके मंजुरीस्तव सादर करण्यात आली आणि शिवभोजन चालकांची बनेवगिरी समोर आली. शिवभोजन चालकांनी सादर केलेल्या देयकात एकाच दिवशी एकाच व्यक्तींच्या दुबार फोटो आहेत. एकाच व्यक्तिचा त्याच स्थितीतील तोच एकदा काढलेला फोटो परत परत अन्य कालावधीमध्ये वापरत असलेला दिसून येत आहे. त्यांना नवेही बदलून दिलेली आहेत. व्यक्ती अन्य दिवशी शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी येऊ शकतो परंतु, संबंधीत शिवभोजन चालकांनी अन्य दिवशीचा फोटो अपलोड न करता एकच फोटो सतत कॉपी पेस्ट केलेला आहे. ऑनलाईन तपासणीत काही शिवभोजन चालक यांनी फोटो अपलोड केलेला दिसन येत नाही व रिक्त फोटोसमोर एक्स. वाय. झेड., पी. क्यु. आर. या पद्धतीने नावे नमुद केलेली आहेत.

शिवभोजन थाळीची पार्सल सुविधा ही दि. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच देण्याबाबत शासनाने सूचना निर्गमित केलेल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत तशा सूचना संबंधित सर्व तहसीलदार यांना निर्गमित केलेल्या होत्या. दि. १ ऑक्टोबर २०२१ पासून पुढील कालावधीमध्येही काही शिवभोजन केंद्रावरती पार्सल वाटप केल्याचे ऑनलाईन दिसून आले. असे असतानाही या कालावधीमधील देयके तहसीदार यांनी मंजुरीस्तव सादर केली आहेत., हे विशेष. काही शिवभोजन चालकांनी शिवभोजन थाळीसह संबंधीत लाभार्थ्यांचे फोटो घेणे अपेक्षीत आहे.

परंतुू काही शिवभोजन चालकांनी संबंधीत व्यक्तींचे फोटो ऑनलाईनला अपलोड केलेले नाहीत. शिवभोजनचे देयक सादर करीत असताना तहसीलदार यांची स्वाक्षरी व शिक्क्यानेच देयक व प्रमाणपत्र जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला सादर करणे आवश्यक आहे. तथापी काही शिवभोजन देयक हे नायब तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने पाठवित असल्याचेही निदर्शनास आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen − 9 =

Close