January 21, 2022

दीदींची रणनीती यशस्वी ठरेल?

Read Time:8 Minute, 55 Second

भाजपसारखा मजबूत पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा लोकप्रिय नेता समोर असताना त्यांना ठोस पर्याय दिला जाईल, तेव्हाच प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय आघाडी प्रभावी ठरू शकेल, ही सध्याची राजकीय स्थिती असल्याचे विरोधकांनी स्वीकारले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच याला पुष्टी देताना काँग्रेसवर अप्रत्यक्ष शरसंधान साधले आहे. पण ममतादीदींना सध्या जरी काँग्रेसला दूषणे देणे व्यवहार्य वाटत असले, तरी बंगालमध्येसुद्धा आज त्यांचा जो जनाधार आहे तो मूळचा काँग्रेसचा आहे, हे वास्तव त्या कशा काय विसरू शकतील?

काँग्रेस पक्ष निष्क्रियतेच्या काळातून जात आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यांच्या मते काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळेच विरोधी पक्षाचा जो धर्म आहे त्याचे पालन होत नाही. हे वक्तव्य करून ममतादीदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांच्या ऐक्यावरच संशय व्यक्त केला आहे. १९९६ मध्ये काँग्रेसपासून विलग होऊन ममतादीदींनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा कोलकता येथे सीताराम केसरी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महाअधिवेशन सुरू होते.

ममता बॅनर्जी या गोव्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करीत असल्या तरी या राज्यात मूळ काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तळागाळातील कार्यकर्ते हीच त्यांची ताकद आहे. ज्या हिमतीने आणि ताकदीनिशी ममतादीदी भाजपचा मुकाबला करीत आहेत, ती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कमी आहे, असे गोव्यातील काँग्रेसच्या विचारधारेवर आणि ध्येयधोरणांवर निष्ठा असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांना कदाचित वाटतही असेल; परंतु निवडणुकच्या काळात या पक्षातून त्या पक्षात जाण्याची जी प्रक्रिया घडते, ती काळानुरूप फिरूही शकते हे ममतादीदींनी ओळखायला हवे. तसेच त्यांनी हेही विसरता कामा नये की, राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांच्या भक्कम एकतेचा रस्ता केवळ काँग्रेसच्याच पुढाकाराने शक्य आहे; कारण देशाच्या सर्व छोट्या-मोठ्या राज्यांत आजही काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकून आहे आणि काँग्रेसची विचारधारा मानणा-या लोकांची संख्या कमी नाही.

२०१९ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे ५४ उमेदवारच विजयी झाले होते; परंतु या एकट्या पक्षाला एकूण ७८ कोटी मतांपैकी १२ कोटी मते मिळाली होती. काँग्रेसचा जनाधार कमी होत असला तरी तो अजूनही एवढा व्यापक आहे की, त्याची ओळख आणि गणना एकमेव प्रमुख विरोधी राष्ट्रीय पक्ष म्हणून केली जाते. याखेरीज ममतादीदींनी प्रादेशिक पक्षांना एकजूट होण्याचे आवाहन केले असले, तरी राष्ट्रीय स्तरावर या सर्व पक्षांनी जर काँग्रेसला पुढे केले आणि इतर पक्ष भक्कमपणे आघाडीत राहिले तरच हे शक्य होऊ शकते. ममतांसह कोणत्याही अन्य प्रादेशिक पक्षाच्या नेत्याला सक्षम राष्ट्रीय नेता म्हणून ओळख लाभलेली नाही, हे सत्य आहे. अखिल भारतीय स्तरावर राहुल गांधी यांच्याप्रमाणे कोणत्याही प्रादेशिक पक्षाच्या नेत्याला समान स्वीकारार्हता नाही. ८० लोकसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात काँग्रेस पक्ष १९८५ पासून कधीच सत्तेत आला नाही आणि पक्षाची राज्यात सातत्याने घसरणच होताना दिसत आहे, हे खरे आहे. परंतु आजही काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या मुख्यमंत्र्यांच्या घरात म्हणजे गोरखपूरमध्ये त्यांना आव्हान देताना दिसतात.

आपले शक्तिस्थान असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपला धोबीपछाड देण्यात ममता यशस्वी ठरल्या; परंतु उत्तर भारतातील अन्य कोणत्याही राज्यात असे यश मिळवून देण्याची ताकद त्यांच्यात नाही. बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांत काँग्रेसचे स्थान आजमितीस नगण्य असल्यामुळे अशा पक्षाच्या नेतृत्वाखाली विरोधकांची आघाडी कशी होणार, हा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. परंतु या राज्यांमध्ये जेवढे स्थानिक पक्ष आहेत, ते काँग्रेसचा जनाधार विभागून घेऊनच शक्तिशाली बनले आहेत, हे आपल्याला विसरता येणार नाही. या दोन्ही राज्यांत ज्या प्रकारे जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण झाले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांची घुसमट वाढली असून, ते खुला श्वास घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला उत्तर प्रदेशात २० जागांवर यश मिळाले होते. याचे कारण एकच होते आणि ते म्हणजे संकुचितपणाच्या भिंती त्या निवडणुकीत ढासळून पडल्या होत्या आणि अमेरिकेबरोबर झालेल्या अणुकरारासारख्या राष्ट्रीय मुद्यावर सामान्य लोकांमध्ये चर्चा घडून येत होती. या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींचे किती उमेदवार विजयी झाले होते, याचा विचार दीदी करू शकतात.
भाजपसारखा मजबूत पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा लोकप्रिय नेता समोर असताना त्यांना ठोस पर्याय दिला जाईल,

तेव्हाच प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय आघाडी प्रभावी ठरू शकेल. आपल्या नेतृत्वाखाली प्रादेशिक पक्षांची एकता घडवून आणल्यास ममतादीदींच्या हाती काय लागेल? राज्यांच्या अंतर्गत धोरणांचा विस्तार त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करू शकत नाहीत. त्यासाठी काँग्रेसच्या वैचारिक बैठकची गरज भासेल. याच वैचारिक आधारावर काँग्रेसने साठ वर्षे या देशाचे नेतृत्व केले. एखाद्या प्रादेशिक पक्षात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांशी लढण्याची पुरेशी कुवत असू शकत नाही. कारण त्यांचे राजकारणच संकुचित जातिसमूह वा भाषिक समूहापासून सुरू होते आणि त्यापुरतेच मर्यादित राहते. म्हणूनच गोव्याचे राजकारण आपल्या बाजूने वळवायचे असेल तर ममतादीदींना सध्या जरी काँग्रेसला दूषणे देणे व्यवहार्य वाटत असले, तरी बंगालमध्येसुद्धा आज त्यांचा जो जनाधार आहे तो मूळचा काँग्रेसचा आहे, हे वास्तव त्या कशा काय विसरू शकतील

-सरोजिनी घोष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 + 17 =

Close