January 21, 2022

दिल्ली सीमेवरील शेतकरी परतीच्या मार्गावर

Read Time:4 Minute, 52 Second

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कृषि कायदे मागे घेणे व शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर आता दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले आंदोलन संपले आहे. शनिवारपासून सिंघू, टिकरी व गाझीपूर या तिन्ही सीमांवरील तंबू, साहित्य गोळा करून शेतकरी परतीला लागले आहेत. तिन्ही सीमा पुन्हा मोकळ््या होऊ लागल्या आहेत. मात्र गेल्या १५ महिन्यांपासून ऊन,पाऊस व कडाक्याच्या थंडीतही आंदोलन केल्यामुळे त्या ठिकाणांवरून माघारी परतताना शेतकरी भावूक झालेले दिसत होते.

संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या आवाहनानुसार शनिवारी सकाळपासून सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सर्व ठिकाणांवरून माघारीची तयारी शेतक-यांनी सुरू केली आहे. इतके दिवस आंदोलन सुरू असताना उभारण्यात आलेले भक्कम असे तंबू, कमानी, मंडप हे सर्व काढण्यास सुरुवात झाली आहे. याचबरोबर मुक्काम करण्याच्या हेतूने सोबत आणलेले साहित्य, आवश्यक सामान, पशुधन हे गाड्यांमध्ये भरून शेतकरी घरी निघाले आहेत. सर्व माघारीची प्रक्रिया पूर्ण व्हायला चार ते पाच दिवस लागतील, मी स्वत: १५ डिसेंबरला आंदोलनाची जागा सोडेन, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. आंदोलनात ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली, त्यांचे आभार मानण्याचे आज सकाळी झालेल्या बैठकीत ठरवल्याचे टिकैत यांनी सांगितले.

दरम्यान, कितलाना टोलवरूनही ३८० दिवसानंतर आज शेतक-यांचे आंदोलन मागे घेण्यात आले. येथेही संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. शनिवारी शेतकरी आणि मजुरांनी गळाभेट घेऊन फुलांची उधळण करीत जल्लोष केला आणि मिठाईही वाटली. एवढेच नव्हे, तर गुलाल उधळून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यासोबतच महिलांनी देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य करून आनंद लुटला. यावेळी शेतकरी आणि मजुरांनी संकल्प केला आणि जर सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, तर संयुक्त किसान मोर्चाच्या १५ जानेवारी रोजी होणा-या बैठकीत यासंबंधीचा आढावा घेतला जाईल आणि पुढील दिशा ठरवली जाईल, असे म्हटले आहे. यावेळी आंदोलनात महत्त्वपूर्ण योगदान देणा-या ८०० शेतकरी आणि मजुरांचा गौरव करण्यात आला.

केंद्राच्या आश्वासनाकडे असणार लक्ष
निघताना आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल शेतक-यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान १५ जानेवारीला एक आढावा बैठक घेतली जाणार असून, केंद्र सरकारने मान्य केलेले इतर मुद्दे अंमलात आणले जात आहेत की नाही, याचा आढावा घेतला जाणार असल्याचेही शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले.

रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू
दिल्लीच्या सीमेवरून शेतकरी आता परतू लागले असून, सीमा भाग जसा रिकामा होईल, तसे त्या भागातील बॅरिकेटस् हटविण्यात येत आहेत. रस्त्यावर ब-याच ठिकाणी पक्के घरे उभी केली होती. तसेच तारांचे कुंपणही लावण्यात आले. याशिवाय जुनी वाहनेही रस्त्यावर लावून रस्ता अडवण्यात आला. आता शेतकरी निघून जाताच तेथे जीसीबीच्या मदतीने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. टिकरी बॉर्डरवरून बरेच शेतकरी निघून गेले आहेत. त्यामुळे टिकरी बॉर्डर खुली केली जात असून, रविवारपासून हा रस्ता सुरू होईल, असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + 17 =

Close