January 25, 2022

दिल्लीला आजच ऑक्सिजनचा पुरवठा करा; दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फर्मान

Read Time:2 Minute, 54 Second

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने आज याच सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला फटकारले आहे. आता आम्हाला ठोस कारवाई हवी आहे. आता तुम्हीच सगळ्याची व्यवस्था करणार आहात. दिल्लीला काहीही करून आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे, असे आदेश केंद्र सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.

ऑक्सजन पुरवठ्याअभावी दिल्लीच्या बत्रा रुग्णालयामध्ये ८ रुग्णांसह एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उच्च न्यायालयात दिल्लीतील काही रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी धाव घेतली आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार या रुग्णालयांकडून केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून जाहीर केलेला साठादेखील पुरवला जात नसल्याची बाजू राज्य सरकारने मांडली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात रोज सुनावणी सुरू असून त्यामध्ये दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही सरकारांना न्यायालयाने वेळोवेळी सुनावले आहे.

केंद्र सरकारला आम्ही निर्देश देतो की त्यांनी काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवावा. त्यासाठीचे टँकर पुरवण्याची जबाबदारीही केंद्राचीच आहे. सरकारने २० एप्रिलला ऑक्सिजन पुरवठ्याचा निर्णय घेतला. पण तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस दिल्लीला ठरलेला पूर्ण ऑक्सिजनचा कोटा मिळालेला नाही. कुणीही तुम्हाला ठरल्यापेक्षा जास्त ऑक्सिजन मागत नाही. तुम्ही जर आज पुरवठा करू शकला नाहीत, तर आम्ही सोमवारी तुमचे विश्लेषण ऐकू, अशा कठोर शब्दांत न्यायालयाने सुनावले. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी दिल्ली सरकारला आवश्यक व्यवस्था उभारण्यासाठी लष्कराची मदत घेण्याचा देखील सल्ला दिला. तुम्ही जर लष्कराची मदत घेतली, तर ते त्यांच्या स्तरावर काम करतील. त्यांच्याकडे त्यांची स्वत:ची व्यवस्था असल्याचे न्यायालयाने दिल्ली सरकारला सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 − four =

Close