दिल्लीत पुन्हा शेतकरी आंदोलन!

Read Time:2 Minute, 55 Second

पोलिसांकडून नाकाबंदी, टिकरी सीमेवर बॅरिकेटस्

नवी दिल्ली : किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) हमीसह आणखी अनेक मागण्या घेऊन शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीला घामटा फोडण्याच्या विचारात आहेत. उद्या (सोमवारी) जंतर-मंतर येथे शेतक-यांकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवाहनापूर्वी दिल्ली पोलिसांनी दिल्ली-हरियाणाला जोडणा-या टिकरी सीमेवर सिमेंटचे बॅरिकेटस उभारण्यास सुरुवात केली. यासोबतच सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली आहे.

दिल्लीकडे येत असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनाही दिल्ली पोलिसांनी रविवारी गाझीपूर सीमेवर रोखले. राकेश टिकैत यांना त्यांच्या काही समर्थकांसह दिल्लीला जायचे होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी नकार दिला. यानंतर टिकैत समर्थकांनी रस्त्यावर बसून विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सर्वांना मधु विहार पोलिस एसीपी कार्यालयात नेले.

टिकैत यांनी शुक्रवारी देशभरातील शेतक-­यांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी देशव्यापी आंदोलनासाठी तयार राहण्याचे आवाहन केले होते. या अगोदर एसकेएमने गुरुवारी सकाळी लखीमपूर शहरातील राजापूर मंडी समितीसमोर धरणे सुरू केले. गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांची हकालपट्टी, तुरुंगात असलेल्या निरपराध शेतक-यांची सुटका, एमएसपी हमी कायदा, वीज दुरुस्ती विधेयक २०२२ मागे घेण्यात यावे, उसाचे पेमेंट यासह विविध मागण्यांसाठी एसकेएमने धरणे आंदोलन केले होते.

टिकैत यांना घेतले ताब्यात
लखीमपूर खेरी येथून दिल्लीला निघालेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राकेश टिकैत यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये सरकारच्या इशा-यावर काम करणारे दिल्ली पोलिस शेतक-यांचा आवाज दाबू शकत नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे, असे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published.

one + twelve =