
दहावी-बारावीची ऑफलाईन परीक्षा कशी देणार | मुख्यमंत्री म्हणतात घरी राहा सुरक्षित रहा
एप्रिल महिन्यामध्ये दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आहे. परंतु, मुख्यमंत्री म्हणतात घरी राहा सुरक्षित राहा अशा परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा कशी देणार, असा प्रश्न आता विद्यार्थी व पालकांना पडला आहे.
यावर्षी बारावीची परीक्षा देणारा वेदांत पोफळे याने सकाळशी बोलताना सांगितले की, मागील वर्षापासून विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा होणार यादृष्टीकोनातून तयारी करत आहेत. शासनाने त्यावेळी सर्व परीक्षा या ऑनलाईनच घेतल्या जातील, असे सांगितले होते. विशेष म्हणजे पालकांनीसुद्धा ऑनलाईन परीक्षेसाठीच पसंती दाखवली होती. आजही आहे. मात्र, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत.
कारण सद्यस्थितीत सर्वत्र भीतीचे वातावरण असताना आपल्या पाल्याला परिक्षेसाठी परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे हे पालकांच्या दृष्टीने कितपत योग्य ठरणार आहे ?
सरकारने एकदा पालक आणि विद्यार्थी यांच्या जागी उभे राहून विचार करावा.
एखाद्या मुलाला कोरोनाची लागण झालेली असेल आणि त्याची बाब ही परीक्षाच्या परिसरात आल्यावर दिसून आल्यास त्याचे आणि बाकीच्या मुलांचे आणि पालकांचे जीव वेठीस धरले जातील, याचाही विचार सरकारने करायला पाहिजे, असेही वेदांत पोफळे यांनी सांगितले.
विद्यार्थी व पालकांना पडलेले प्रश्न
परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? जर शासनाने ठरवलेल्या निकषानुसार परीक्षा ऑफलाईन झाली तर
- विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडतांना आणि आणतांना होणारी गर्दी ?
- गावाकडील विदयार्थ्यांना होणारी धावपळ?
- उत्तर पत्रिका आणि प्रश्न पत्रिका ही किती जणांच्या संपर्कातून आलेली असेल तिचा स्पर्श ?
- कोरोनाची भिती मनात ठेऊन परीक्षा देतांना येणारा ताण आणि गुणांवर होणारा परिणाम ?