दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात?

Read Time:2 Minute, 32 Second

पुणे : अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे देण्यात येणारे दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याचे सूतोवाच राज्याच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनासंदर्भातील डेटा शिक्षण विभागाकडे जमा होण्यास सुरुवात झाली असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे.

यासाठी ऑप्टिकल मार्क्स रीडिंग ही पद्धत वापरली जाणार असल्याचेही शिक्षण विभागाच्या उच्चपदस्थ अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे. दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळा पातळीवर गुणांकन करण्याची जबाबदारी दिली आहे. नुकतीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत बहुतांश मुख्याध्यापकांनी अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असल्याचे सांगितले असून, शाळांकडून ऑप्टिकल मार्क्स रीडिंग शीट भरून पाठवल्या जाणार आहेत.

या शीटद्वारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण राज्य माध्यमिक मंडळाकडे जाणार असून, त्याद्वारे निकालाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता याच महिन्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या परीक्षा झाल्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटी अकरावी प्रवेश सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × 4 =