
दहशतवादविरोधी पथकातील अधिकारी काश्मीर खो-यात रवाना
नवी दिल्ली : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी शाळेत घुसून केलेल्या हत्यांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. निर्दोष, निष्पाप आणि अल्पसंख्यांकांची हत्या करणा-यांना त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची स्थानिक मॉड्यूल मोडून काढण्यासाठी केंद्राने दहशतवादाविरुद्ध लढण्यात पारंगत असलेल्या अधिका-यांना खो-यात पाठवले आहे.
काश्मीर खो-यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची केंद्राने गंभीर दखल घेतली आहे. गृहमंत्री अमित शहा यांची काश्मीरप्रश्नावर गुरुवारी अधिका-यांसोबत तब्बल पाच तास बैठक चालली. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाचा भाग असलेल्या टीआरएफच्या अतिरेक्यांनी मागच्या काही दिवसात श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ले केले आहेत. एक काश्मिरी पंडित, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि अन्य दोघांची हत्या केली आहे.
सीटी टीम काश्मिरात दाखल
दहशतवाद विरोधी लढ्यात पारंगत असलेले इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन देका काश्मीर खो-यात जाणार आहेत. स्वत: ते लक्ष घालणार आहेत. अन्य सुरक्षा यंत्रणांच्या सीटी टीम्स आधीच काश्मीरमध्ये दाखल झाल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असताना हे दहशतवादी हल्ले सुरु झाले आहेत. काश्मीर खो-यातील सर्व हॉटेल्समध्ये १०० टक्के बुकिंग झाले आहे. आर्थिक घडामोडींना वेग येत असताना असे हल्ले होत आहेत.