January 19, 2022

दसरा मेळावा हा वंचितांचा मेळावा

Read Time:3 Minute, 9 Second

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दरवर्षी दसरा मेळावा भगवानगडावर पार पडत होता. पण मागील तीन वर्षांपासून हा मेळावा आता बीड जिल्ह्यातील संत भगवान बाबांच्या जन्मगावी पार पडत आहे. बीडच्या भगवानभक्ती गडावर शुक्रवारी दसरा मेळावा संपन्न होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी सुरू असून या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

बीडमध्ये शुक्रवारी होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा तसेच कोणत्याही वर्गाचा नाही. शुक्रवारी होणारा दसरा मेळावा हा डोंगर कपारीतील कष्टक-यांचा, वंचितांचा मेळावा आहे, असे सांगतानाच या मेळाव्याला येणारा कार्यकर्ता हा विचारांची ऊर्जा घेऊनच जातो, असे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.

पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडत असतो. पण मागील वर्षी कोरोनामुळे हा मेळावा होऊ शकला नाही. तसेच हा मेळावा कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या आग्रहाखातर होत आहे. यावेळी तेथील मेळाव्याचं रूप कसं सुंदर आणि देखणं असणार आहे, हे तेथील येणा-या लोकांवर अवलंबून आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, बीडमध्ये दस-याला भगवान बाबांच्या भक्तीचा मेळावा जमत असतो. हृदयातून निघालेला संवाद हा हृदयापर्यंत पोहोचत असतो. हीच खरी नेतृत्वाची ताकद आहे. तसेच हा मेळावा भक्तीची परंपरा आहे. लोकांनी आदेश द्यायचा आणि मी स्वीकारायचा हाच राजकारणाचा मूलमंत्र आहे, असेही पंकजा मुंडेंनी सांगितले आहे.

प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला
खासदार प्रीतम मुंडे यांनी विकासाच्या मुद्यावरून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. आपण जे टगे पोसत आहात ते कोणत्या कामाची बिले काढतायत याचा अंदाज घेतला तर विकासाची कामे कोण करतंय हे स्पष्ट होईल, असे म्हणत प्रीतम मुंडे यांनी बीडच्या पालकमंत्र्यांवर निशाणा साधला. बीडमध्ये सध्या खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे. मेळाव्यानंतर जिल्ह्यात अनेक कार्यक्रम झाले, जेसीबीने फुलं उधळली गेली, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two − two =

Close