दक्षिण आशियाला जमात-उल-मुजाहिदीन शक्तीचा धोका

Read Time:3 Minute, 52 Second

कोलकाता : जमात-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून कोलकाता पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेल्या तीन बांगलादेशींना कोलकात्यातून जुलैमध्ये अटक केली. या घटनेची गंभीर दखल दक्षिण आशियातील सुरक्षा विभागांतील अधिकाºयांनी घेतली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अटकेनंतर महिनाभरात तालिबानने अफगाणिस्तानातील हेरात, कंदाहारसह इतर शहरे ताब्यात घेतली. सुरक्षा विश्लेषकांनी या संघटनेची पाळेमुळे तालिबानशी जोडली असल्याचे म्हटले आहे.

मागील अफगाण युद्धात या संघटनेचा सहभाग असल्याचे पुरावे सापडल्याने तालिबानच्या अफगाणिस्तानातील सरशीमुळे ‘जमात’ संघटना देशाच्या पूर्व भागांत पुन्हा वाढण्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अफगाण युद्धातील म्होरक्यांनी जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश संघटनेची कशी स्थापना केली आणि १९९९ च्या आसपास शेजारील बांगलादेशात दहशतवादी कारवायांना कशी सुरुवात केली हे आम्ही पाहिले आहे. दक्षिण आशियात मध्ययुगीन राज्य प्रस्थापित करण्याची या दहशतवादी संघटनेची मनिषा आहे. त्यामुळे भारत, बांगलादेशने अफगाणिस्तानातील तालिबानच्या चढाईची घटना लक्षात घेऊन संभाव्य परिणाम टाळण्यासाठी प्रयत्न सुरू करण्याची गरज असल्याचे मत माजी पोलिस अधिकारी व्यूहरचना विश्लेषक शंतनू मुखर्जी यांनी व्यक्त केले.

देशांतर्गत सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे
सध्याची स्थिती गोंधळाची आहे. अफगाणिस्तानतील सत्तासंघर्षाचे परिणाम शेजारील देशांना जाणवणारे आहेत. त्यामुळे देशांतर्गत सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत बांगलादेशचे भारतातील माजी उच्चायुक्त तारीक करीम यांनी दूरध्वनीवरून व्यक्त केले.

भारत-बांग्लादेश सीमाभागांत कारवाया?
अफगाण युद्धातील शेख अब्दुल रेहमान याला २००७ मध्ये बांगलादेशात फाशी देण्यात आली. त्यानंतर तीन महिन्यांनी ‘जमात’चा नेता मौलाना सैदुर रेहमान याला तुरुंगात टाकण्यात आले. त्यानंतर सलाऊद्दीन अहमद याच्या खांद्यावर संघटनेची धुरा सोपवण्यात आली. तो सध्या भारत-बांग्लादेश सीमाभागांत लपला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अतिरेक्यांनी व्यापला अफगाणचा भाग
१९९० च्या आसपास तालिबानमधील बहुतेक अतिरेकी हे बांगलादेशातील तळांवरून भरती करण्यात आले आहेत. या अतिरेक्यांनी अफगाणिस्तानातील बहुतेक भाग व्यापलेला आहे. तालिबानमध्ये प्रवेश करून बांगलादेश अफगाणिस्तानात विलीन करू अशी त्यांची प्रतिज्ञा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

three + five =