January 19, 2022

त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने

Read Time:2 Minute, 54 Second

परभणी/प्रतिनिधी
त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजासह धार्मिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ परभणीत विविध पक्ष, संघटनांसह मुस्लिम समाज बांधवांनी शुक्रवार,दि.१२ रोजी दुपारी जोरदार निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदवत त्रिपुरात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ परभणी शहरातील अनेक भागात व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवून त्या ठिकाणच्या हल्ल्याचा निषेध नोंदवला.

महानगरपालिकेतील गटनेते सय्यद समी उर्फ माजू लाला, ज्येष्ठ नेते विजय वाकोडे, मुफ्ती शेख जहांगिर नदवी, जाफर खान मुसा खान, मौलाना हाफेज मुजीब दहेलवी, हाफेज मुजीब खारी, डॉ.धर्मराज चव्हाण, शेख अखील शेख रहीम, चंदासिंग बावरी, कॉ.राजन क्षीरसागर, गणपत भिसे, शेख मुद्दसीर असरार, अ‍ॅड. आसेफ पटेल यांच्यासह अन्य पुढा-यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी मुस्लिम समाजातील संतप्त नागरीकांनी त्रिपुरा राज्य सरकारला तातडीने बरखास्त करावे अशी मागणी केली. त्रिपुरात धूमाकुळ घातलेल्या व कायदा व सुव्यवस्था बिघडवणा-या व्यक्ती व संस्थांविरुध्द कठोर कारवाई करावी.

त्रिपुरा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. दंगलीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. उद्ध्वस्त झालेल्या धार्मिक स्थळांची पूनर्बांधणी करावी. हल्लेखोरांना सहकार्य करणा-या पोलिस अधिका‍-यांना सेवेतून बडतर्फ करावे तसेच तेथील वकील व पत्रकारांविरुध्दचे खटले मागे घ्यावेत यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळा परीसरात मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 1 =

Close