
त्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी
मानवत : शहरातील तकिया मोहल्ला परिसरात राहणारे अख्त्तर शाह जलील शाह या युवकाचा दि.०६ फेब्रुवारी २०२० रोजी ताडबोरगाव शिवारात निर्घुणपणे हत्या करून अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. या खुनाचा तपास सीआयडीकडे देवून गुन्हेगारांना अटक करावी अन्यथा या विरोधात १७ जानेवारी २०२२ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा मयत इसमाच्या कुटुंबियांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला सोपवण्यात आला होता. यात संशयित व्यक्तीची चौकशी करण्यात आली मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर नातेवाईकांनी मानवत पोलीस स्टेशन समोर उपोषण केले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असे आश्वासन दिले होते.
अद्यापही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. या प्रकरणी मयताचे नातेवाईक व महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने गुरुवार, ०२ डिसेंबर रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड व परभणी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देवून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर मयताची पत्नी रिजवाना अख्तर शाह, वडील जलिल शाह, भाऊ रौफ शाह, आई लतिफा जलिल शाह व महाराष्ट्र मुस्लिम प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष जिलानी जलील शाह यांच्या स्वाक्ष-या आहेत.