तुलना ही मुलांचा आनंद हिरावून घेणारी चोर आहे…

Read Time:9 Minute, 59 Second

‘तुला कितीदा सांगायचं नरेन तू नीट लिहीत जा, लक्ष देत जा, तुला सगळ्या गोष्टी देतो रे आम्ही, तरीही तू बदलत नाहीस, त्या जयकरचा हिमांशू बघ कसा नीटनेटका लिहीतो. तोसुध्दा तुझ्याच क्लासमध्ये आहे ना?’’ सपना खूप वेळपासून हे बोलतीये, नरेन तिच्या सर्व गोष्टी निर्विकार चेह-याने टिपतोय… दुसरीकडे हातातल्या किंडरजॉयशी त्याचा खेळ चालूच आहे. असं दृश्य कमी-अधिक प्रमाणावरती बहुतांश कुटुंबांत पहायला मिळतं. मुलांचे पालक म्हणून आपली जबाबदारी आहे आणि त्यांना योग्य वयात वळण लावलं तर ते घडतील ही काळजी देखील पालकांच्या जागेवरती अगदी योग्य आहे.

थिओडोर रुझवेल्ट यांनी म्हटलं आहे की, ‘‘तुलना ही मुलांचा आनंद हिरावून घेणारी चोर आहे.’’ आपल्या पालक म्हणून असलेल्या सर्व भूमिकांची योग्य प्रकारे पुनर्तपासणी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणजे आपली मुलांकडूनची अपेक्षा पालक म्हणून योग्य असेलही पण ज्या पध्दतीने आपण आपल्या मुलाची तुलना इतरांशी करतो ही पध्दत अत्यंत चुकीची आणि त्यांच्या जडणघडणीवर प्रचंड नकारात्मक परिणाम करणारी आहे.

आपण सर्व जण आपल्या पद्धतीने वेगळे आहोत. प्रत्येकाकडे काही ना काही विशेष कौशल्ये आहेत, आवडीनिवडी आहेत, व्यक्तिमत्त्वाची विविधअंगी वैशिष्ट्ये आणि तेवढ्याच जबरदस्त क्षमता आहेत ज्यामुळे आपण नक्की कोण आहोत याची प्रचीती येते आणि हीच गोष्ट आपल्या मुलांनाही लागू होते. आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी सतत करून आपण त्याची चिंता वाढवतो आणि ताणही. खरं पाहिलं तर आपल्या मुलांना त्यांच्या पालकांना खूप आनंद द्यायचा असतो पण त्यांना लहान असल्यामुळे नक्की काय करायला हवं याचं योग्य आकलन होत नाही. अशा वेळी दोन शक्यता असतात एक म्हणजे मूल कोणत्याही सामाजिक उपक्रमात सहभागी व्हायला घाबरतं, नाही तर टोकाचा आक्रमकपणा त्याच्या वर्तनात येतो.

पालक म्हणून आपण याबद्दल काय करू शकतो?
प्रथमत: आपण हे ध्यानात घेतले आहे का? आपण पालकत्वाच्या प्रवासाला ज्या दिवशी सुरुवात केली, त्या दिवसापासून जणू काही आपलं मूल जगावेगळं झालं पाहिजे, त्याला अमुक प्रकारे वाढवायचं, त्याची शाळा तमुक असणार, अशा प्रकारचं नियोजन आपलं सुरू होतं आणि ते वाईट अजिबात नाही पण यामध्ये आपण पालक म्हणून आपल्याही नकळत आपले मापदंड पक्के करत असतो. त्याच्या घडण्याचा दर्जा ठरवत असतो. म्हणजेच आपल्या प्रतिष्ठेला साजेल अशा सोयी-सुविधांची, चांगल्या आणि वाईटाची तुलना तिथून सुरू होते. या धारणा हळूहळू घट्ट होत जातात आणि मूल वाढवण्याच्या बाबतीत बाकीच्या पालकांपेक्षा आपले मापदंड कसे वेगळे आणि सरस आहेत याचं आत्मसुखही हलक्या पावलांनी त्यामागे येतं. मग त्याने कसं? किती? कुठे? काय? वाढायचं आहे त्याचे मापदंड घालून दिले जातात. जणू एखाद्या महागड्या वस्तूचा वापर कसा? किती? कोणी? कुठे करायचा? याच्या पाय-या ठरवल्या जातात.

त्यानुसारच मुलांनी कसं वाढायचं? घडायचं असतं. कधी कधी हे मापदंड चांगले देखील असतात. पण या सर्व प्रक्रियेत काय हरवलं जात असेल तर ते नैसर्गिकरीत्या मुलांचा होणारा विकास सूक्ष्मपणे पहायला तो आनंद घ्यायला पालक विसरतात. बाळाचं पहिलं हसू, त्याची नजर पकडणं, त्याची आरोळी, त्याने पहिल्यांदा पकडलेलं बोट, पोटावरती पडणं, एका बाजूला होणं, हे टप्पे म्हणजे मूल वाढण्यातील मैलाचे दगड असतात. ते खरं तर पालकांनी अनुभवले पाहिजेत पण गप्पा घरात सुरू काय असतात. ‘‘आमचा मनिष की नाही, अवघ्या दोनच महिन्यांत पालथा पडला, फारच लवकर उभा राहिला, त्याला फार काळ चालण्यासाठी नाही लागला’’ या संवादातून नवोदित आई-बाबांच्या मनात देखील आपल्या मुलांना सर्व काही पट्दिशी आलं पाहिजे याची आवर्तनं सुरू होतात.

खरं पाहिलं तर हाच सुरुवातीचा काळ मुलांच्या मेंदूच्या जडणघडणीतला सर्वांत महत्त्वाचा काळ असतो. मुलांच्या वाढीचं निरीक्षण करण्याऐवजी मग त्याची इतरांशी तुलना केल्याने समस्या उद्भवतात. या समाजाने घालून दिलेल्या मापदंडाच्या मोजपट्ट्या मुलांच्या मनात भीती, न्यूनगंड, लाजाळूपणा आणि ताण निर्माण करतात. वेळोवेळी मुलांशी आपला संवाद असेल तर ते कमी होतं पण या विपरीत परिस्थितीत कायम राहिल्यास नक्कीच मूल अधिक संकुचित अवकाशात अडकलं जाण्याची शक्यता अधिक आहे. मूल मोठं झालं तरी त्याच्या मनात स्वत:बद्दल प्रश्न उभे राहतात. आत्मविश्वास कमी होतो. सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात त्यांना वावरण्याचा विश्वास मिळवण्यासाठी धडपडावं लागतं. सर्व काही करता येत असलं तरी पुन्हा पुन्हा स्वत:विषयी शंका येतात.

पालकांनी काय करायला हवं…
१. जागरूक रहा. कधीकधी आपण विचार करण्यापूर्वीच बोलतो. जेव्हा आपण आपल्या मुलाने काहीतरी करावं असा प्रयत्न करत असतो, किंवा त्याला सुचवत असतो तेव्ही ती अपेक्षा नैसर्गिक आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे.
२. आपल्या संवादाकडे लक्ष द्या- प्रत्येक वेळी तुम्ही काय म्हणत आहात? आणि तुम्ही हे का म्हणत आहात याचा विचार करा. तुम्हाला एक पालक म्हणून तुमची नक्की कोणती सवय बदलायला आवडेल? आपल्या मुलाला अमुक एक गोष्ट करणं हे का कठीण वाटते? हे काम करण्यासाठी त्याच्याकडे योग्य कौशल्याची कमतरता आहे का? याचा विचार करण्यासाठी वेळ काढून आपण निरीक्षण करायला हवं आपल्याही भावनांचं निरीक्षण तसेच चिंतन करायला हवं. तसं केलं तरच त्याच्या आणि आपल्या भावनांचं न्याय्य व्यवस्थापन होईल.
३. न्यायनिवाडा करू नये… आपल्या मुलाबद्दलचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आपण प्रथम मनातून पुसून टाकायला हवा. काहीही केलं तरी हा की नाही असाच आहे वेंधळा, याला काहीच जमत नाही, नक्की यानेच केलं असणार ही ती मनातील धारणा असते. ती डोक्यात ठेवून आपल्या मुलांशी संवाद करू नये तर सध्या या क्षणाला काय चालू आहे. वर्तमानात काय घडत आहे याचा विचार करा. वस्तुनिष्ठपणे विचार करून ते ऐकायला हवं म्हणजे दोघांनाही मदत होईल.
४. मुलांच्या प्रगतीचा एक मानदंड तयार करा. आपल्या मुलाची वैयक्तिक वाढ आणि प्रगतीचा मागोवा घेण्यासाठीच बेंचमार्क वापरा म्हणजे तुमचा एक मानदंड तयार करा उदा. ‘तीन महिन्यांपूर्वी तुला संपूर्ण वाक्य वाचता येत नव्हतं पण आता, तू एक संपूर्ण परिच्छेद वाचू शकतोस. ही चांगली प्रगती आहे आणि मला ती खूप आवडली बरं. अशीच प्रगती कर. तू नक्की करू शकतोस’ पण हे चुकूनही म्हणू नये की, ‘‘तुझ्या वयाचा असताना तुझा मोठा भाऊ अमेय अख्खं पुस्तक खडाखडा वाचत होता.’’ अशा वेळी मुलांनी आता काय केलंय त्यावरती भर द्यायला हवा. तसे केल्याने त्याला वाटतं मला समजून घेणारं आहे कोणीतरी. मी योग्य आहे हा आत्मविश्वास वाढतो. आपल्या मुलांच्या कामगिरीचा मागोवा घेण्यावर लक्ष केंद्रित करा आणि इतर कोणाशीही तुलना करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 + 17 =