तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही

Read Time:3 Minute, 9 Second

कोल्हापूर : शेतक-यांना उसाची एफआरपी एकरकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी त्यांनी एफआरपीच्या मुद्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.

राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या आंदोलनाची घोषणा केली. येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन छेडण्यात येईल. आराधना शक्तिस्थळापासून हे आंदोलन सुरू करू, असे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पूरपरिस्थितीवरूनही राज्य सरकारवर टीका केली. पूरग्रस्तांना अद्यापही मदत करण्यात आली नाही. आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.

स्वाभिमानी संघटना झोपली नाही
केंद्र आणि राज्य सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचे कारस्थान रचलेय. भाजपनेच एफआरपीचे तुकडे करण्याचे अनौरस बाळ जन्माला घातलेय. आम्ही ते खपवून घेणार नाही. पुण्यात भाजपचे एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन झाले. पुढच्या महिन्यात संपूर्ण राज्यात हे आंदोलन होईल, असे सांगतानाच स्वाभिमानी कोरोना नियमांचे पालन करून आंदोलन करते. स्वाभिमानी संघटना झोपली असा गैरसमज कुणीही करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

इथेनॉल निर्मितीचा निर्णय चांगला
१५ सप्टेंबरपासून कारखाने सुरू करायला मंत्री समितीने परवानगी दिली आहे. राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी स्वाभिमानीच्या ऊस परिषदेशिवाय पश्चिम महाराष्ट्रात कारखाने सुरू होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कधी नव्हे ते साखर उद्योगाला चांगले वातावरण आहे. उसाच्या रसापासून तयार होणा-या इथेनॉल निर्मितीचा निर्णय प्रोत्साहन देणारा आहे. आता कारखानदारांना कोणतीही ओरड करता येणार नाही. त्यांनी आता कोणतीही सबब सांगू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 + 19 =