May 19, 2022

तिस-या लाटेचा बागुलबुवा?

Read Time:9 Minute, 15 Second

गत तीन आठवड्यांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत देशभरात सातत्याने घट होत चालली आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मध्यंतरी टिपेवर असलेली कोरोनाची दुसरी लाट आता धापा टाकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता निर्बंध शिथिल केल्यानंतरसुद्धा रुग्ण घट कायम राहील असा विश्वास सरकारला वाटतो. तरीसुद्धा सरकारने आणि जनतेने गाफिल राहून चालणार नाही. कारण कोरोनाची तिसरी लाट येणार असून त्यात नवजात बालकांपासून ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना धोका असण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सप्टेंबरपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.

पहिली लाट ज्येष्ठांच्या मुळावर होती. दुस-या लाटेचा तरुणाईला जबर तडाखा बसला. तिस-या लाटेत मुलांवर वक्रदृष्टी होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. युरोपात याआधीच तिसरी लाट आल्याचे सांगितले जाते. सरकार, प्रशासन, डॉक्टर व शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या दिलेल्या इशा-यांमुळे पालकांची पाचावर धारण बसली. आधीच दुस-या लाटेत गटांगळ्या खाणा-या समाजमनाच्या नाकातोंडात पाणी गेल्यासारखे झाले आहे त्यात तिस-या लाटेच्या अंदाजावर त्याने तरावे कसे? त्यामुळे तिस-या लाटेचा तर्क कशावर आधारित आहे हे समाजमनाला समजावून सांगितले पाहिजे. इजा, बिजा अन् तिजा हे बिनबुडाचे उत्तर नको आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेची संभाव्य कारणे आता जनतेला थोडीफार समजली आहेत. पहिल्या लाटेच्या वेळी वैद्यकीय जग उपचारांविषयी अनभिज्ञ होते, कोणतीही पूर्वतयारी नव्हती तरीही अपु-या साधनसामग्रीसह विषाणूचा ब-यापैकी मुकाबला करण्यात आला.

लस उपलब्ध नसतानाही मृत्युदर कमी राहिला. त्यानंतर कोरोना हद्दपार झाला असे गृहित धरून सरकार आणि जनता गाफिल राहिली. नेमका या गाफिलपणाचा फायदा कोरोनाने उचलला. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुस-या लाटेने हाहाकार उडवला. तिच्याबद्दलचे सारे अंदाज चुकीचे ठरले. दुस-या लाटेच्या कालावधीत लस उपलब्ध असतानासुद्धा जनतेची दाणादाण उडाली, आरोग्य व्यवस्थेचा फज्जा उडाला, त्यामागे सत्ताधा-यांचा दूरदृष्टीचा अभाव हेच नेमके कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. लसींसाठी कोट्यवधी डॉलर्स गुंतवणा-या देशांनी बुद्धी गहाण टाकली नव्हती, त्यांनी भविष्याचा अंदाज घेत अचूक नियोजन केले होते, ज्याचा भारताकडे लवलेशही नव्हता. अमेरिकेने १२ अब्ज डॉलर्स, रशियाने १२ कोटी तर चीनने ७० कोटी डॉलर्स लसींसाठी गुंतवले होते. भारताची मात्र लसींची नोंदणी शून्य होती!

तज्ज्ञांनी, वैज्ञानिकांनी दिलेले सल्ले सरकारने गांभीर्याने घेतलेच नाहीत. सीरमकडे आधी मागणी नोंदवलीच नाही आणि नंतर त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला हे कोणते धोरण? सरकारच्या फाजील गाफिलपणाचे परिणाम आता जनता भोगते आहे. तिस-या लाटेच्या शक्यतेसंबंधी इतर देशांतील साथरोगाचे वर्तन हे एक कारण असू शकते. आतापर्यंत लहान मुले सुरक्षित राहिली याचे कारण कोरोनाच्या डीएनएमध्ये दडले आहे की १८ वर्षांवरील लोकसंख्या अजून जास्त प्रभावित झाल्यास घरातील लहान मुले बाधित होण्याची शक्यता आहे याचा खुलासा झाल्यास वैद्यकीय व्यवस्था सक्षम करता येऊ शकते. त्या दृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. आधीच पहिल्या टाळेबंदीपासून लहान मुले घरातच बसून आहेत. त्यांची चिडचिड वरचेवर वाढत चालली आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असेल या भाकिताला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यांना संसर्ग झाला तरी संसर्गाचे स्वरूप गंभीर होण्याची शक्यता अत्यल्प आहे असा निर्वाळा राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिला आहे.

लहान मुलांची काळजी घ्या मात्र घाबरून जाऊ नका असे आवाहनही त्यांनी केले आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली तेव्हापासून लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण स्थिर आहे शिवाय त्यांचा आजार गुंतागुंतीचा होत नाही असेही दिसून आले आहे. तिस-या लाटेची शक्यता आहे मात्र ती कधी येईल ते सांगणे अवघड आहे. ९० टक्के मुलांमध्ये कोरोना सौम्य स्वरूपाचा असेल, काही मुलांना अतिदक्षता विभागाची गरज लागू शकते असेही बालरोगतज्ज्ञांचे मत आहे. गत सहा महिन्यांत पाच वर्षांखालील मुले बाधित होण्याचे प्रमाण प्रति महिन्याला एकूण रग्णसंख्येच्या एक ते दीड टक्का राहिले आहे. लहान मुलांचे नियमित लसीकरण पूर्ण करा. मात्र तिस-या लाटेच्या भीतीमुळे मुलांवर निर्बंध घालू नका असे आवाहनही डॉ. आवटे यांनी केले आहे. एका सर्वेक्षणात १० ते १७ वयोगटातील रुग्णांची संख्या २५ टक्के होती.

पण मुलांमध्ये प्रौढांपेक्षा आजाराची लक्षणे सौम्य होती. म्हणून तिस-या लाटेत फक्त मुलांचे प्रमाण अधिक असेल अथवा फक्त मुलेच बाधित होतील असे नाही. कोविड-१९ हा आजार जसा मोठ्यांना होऊ शकतो तसाच व तेवढ्याच प्रमाणात मुलांनाही होऊ शकतो. मुलांमध्ये तीव्र आजार होण्याची शक्यता कमी असते कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.जर एकूणच मुलांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक असेल तर तीव्र लक्षणे असण्याचे प्रमाण जास्त असू शकते. मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी ९५ टक्के मुलांना सौम्य लक्षणे असतील आणि ती गृहविलगीकरणात बरी होतील. तेव्हा तिस-या लाटेचे भय बाळगू नका असा सल्ला बालरोगतज्ज्ञांच्या कृतिदलाने डॉक्टरांना दिला आहे. तिस-या लाटेचे भय बाळगू नका असेही त्यांनी म्हटले आहे. नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. मे महिन्यात शून्य ते १८ वयोेगटातील बाधित मुलांची संख्या सुमारे दहा हजार झाली आहे. गत तीन महिन्यांत १८ हजार बालके बाधित झाल्याचे वृत्त चिंताजनक आहे. कोरोनावर मात करायची असेल तर लसीकरणातील सर्व अडथळे दूर करून वेगाने लसीकरण करण्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. आजवर ज्या चुका झाल्या त्या मान्य करून सहकार्याचे आवाहन केल्यास जनता नक्की साथ देईल अर्थात त्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − thirteen =

Close