July 1, 2022

तिसरी लाट : धास्ती आणि वस्तुस्थिती

Read Time:9 Minute, 20 Second

कोविड-१९ ची तिसरी लाट भारतात लवकरच धडकण्याची शक्यता असून, याबाबत देशात विविध अंदाज बांधण्यात येत आहेत. तिसरी लाट खरोखर येईल का? आलीच तर दुस-या लाटेप्रमाणे ती भारताला जोरदार धक्का देईल का? भारतातील लोकांनी आणि यंत्रणेने पुरेशी काळजी घेतली तर ही लाट टाळता येईल का? सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीचे (सीसीएमबी) माजी संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी यापैकी काही प्रश्नांची उत्तरे एका मुलाखतीत दिली आहेत. डॉ. मिश्रा सध्या सीसीएमबीमध्ये जगदीशचंद्र बोस नॅशनल फेलो आणि डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर म्हणून काम पाहतात.

भारतात सुमारे १० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे; परंतु सिरोप्रिव्हेलन्स सर्वेक्षणानुसार ६८ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. तिसरी लाट आलीच तरी ती सौम्य असेल, असा याचा अर्थ होतो का? वस्तुत: तसे अपेक्षित आहे; परंतु ज्या ३० टक्के लोकसंख्येमध्ये सिरोपॉझिटिव्हिटी तयार झालेली नाही आणि लसीकरणही झालेले नाही, ती संख्याही खूप मोठी आहे. त्या लोकसंख्येला संसर्ग होऊ नये, अशीच सर्वांची इच्छा असेल. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, कारण संसर्ग अजूनही अस्तित्वात आहे. परंतु तिला लाट म्हणण्यापेक्षा तो एक ‘तरंग’ असेल अशी अपेक्षा आहे. ही लाट अधिक स्थानिक स्वरूपाची असण्याचीही शक्यता आहे.

मोठ्या संख्येने लोकांना लसीचे एक किंवा दोन डोस देण्यात आले आहेत आणि विशेषत: मोठ्या शहरांमध्ये लक्षणीय संख्येने लोकांमध्ये सिरोपॉझिटिव्हिटी दिसून आली आहे. या दोन प्रमुख आधारांवर तिसरी लाट सौम्य करण्यास मदत होणार आहे. मोठ्या शहरांमध्ये संसर्गाच्या लाटा अधिक नुकसान करतात. त्यामुळेच अशा शहरांमध्ये तिसरी लाट सौम्य असण्याची शक्यता आहे. सिरोपॉझिटिव्हिटी ही लसीकरणाइतकी प्रभावी नसली, तरी संसर्ग ब-यापैकी दूर ठेवण्यास त्यामुळे मदत होते.

तिसरी लाट किती मोठी असेल, हे तीन घटकांवर अवलंबून असणार आहे. आपण कोविड नियमावलीचे व्यवस्थित पालन करणार की नाही, हा सर्वांत महत्त्वाचा घटक ठरेल. म्हणजेच, आपण सातत्याने मास्क वापरला पाहिजे आणि गर्दीचे सोहळे टाळले पाहिजेत. कारण गर्दी म्हटल्यावर, त्यात एखादी तरी ‘असंरक्षित’ व्यक्ती असू शकते आणि त्या व्यक्तीमुळे विषाणूचा प्रसार होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आपण मोठ्या संख्येने चाचण्या सुरू ठेवल्या पाहिजेत आणि जे संसर्गग्रस्त आढळतील त्यांना शोधून लगेच वेगळे (आयसोलेट) केले पाहिजे. विषाणूचा प्रसार रोखण्याचा हा एक प्रभावी मार्ग ठरतो. जर आपण चाचण्याच केल्या नाहीत, तर कोण संसर्गग्रस्त आहे आणि विषाणू कुठे पसरत आहे, हे आपल्याला कळणारच नाही. तिसरा महत्त्वपूर्ण घटक आहे लसीकरण. आपण जर दररोज सुमारे एक कोटी लोकांचे लसीकरण करू शकलो तर आगामी काही महिन्यांत विषाणूचा प्रसार प्रभावीपणे रोखू शकू. जर आपण या तीन गोष्टींचे प्रभावीपणे पालन केले आणि लोकांनी सहकार्य केले तर कदाचित आपल्याला तिसरी लाट येऊन गेलेलीही कळणार नाही.

परंतु दोन गोष्टी अशा आहेत, ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत. एक म्हणजे, सिरोपॉझिटिव्हिटी किती काळ टिकते हे आपल्याला ठाऊक नाही. ती सहा महिने टिकते की त्याहून अधिक काळ टिकते हेही आपल्याला माहीत नाही. पहिल्या लाटेत संसर्गग्रस्त झालेल्या लोकांपैकी किती जणांच्या शरीरात अँटीबॉडीज अद्याप टिकून आहेत, हे आपल्याला माहीत नाही. सिरोपॉझिटिव्हिटी जास्त काळ टिकेल अशी केवळ आशाच आपण करू शकतो. जो दुसरा घटक आपल्या हातात नाही, तो आहे विषाणूचे उत्परिवर्तन. वस्तुत: काही प्रमाणात ते आपल्या हातात आहे असेही म्हणता येईल. असे म्हणण्याचे कारण म्हणजे जेव्हा विषाणू लोकांना संसर्गग्रस्त करतो तेव्हाच विषाणूच्या संख्येचा आपल्या शरीरात गुणाकार होत जातो. लक्षणे दिसून येत नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले लोक जर मोठ्या संख्येने असतील तरीही ते विषाणूचे वाहक आहेतच आणि विषाणूला नवीन रूपे तयार करण्यासाठीही (उत्परिवर्तन) ते मदत करत आहेत, असे म्हणावे लागेल. यातील काही व्हेरिएन्ट जर डेल्टापेक्षा धोकादायक असतील तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

तूर्तास तरी डेल्टा किंवा डेल्टा प्लसपेक्षा अधिक धोकादायक व्हेरिएन्ट पाहायला मिळालेला नाही. डेल्टा प्लस व्हेरिएन्टही फार मोठ्या संख्येने अस्तित्वात नाही. डेल्टाचा प्रसार मात्र मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सध्याच्या संसर्गग्रस्तांपैकी ९० टक्के लोकांमध्ये हा व्हेरिएन्ट दिसतो आहे. डेल्टा व्हेरिएन्ट हा अतिजलद संसर्ग पसरविणारा असला, तरी आता आपल्याला तो नियंत्रित करता येत आहे, ही चांगली बाब आहे. वस्तुत: डेल्टापेक्षा भयावह प्रतिरूप तयार करणे विषाणूलाही फारसे सोपे नाही. तशी शक्यता फार कमी आहे. याचा अर्थ आता कोणत्याही नवीन व्हेरिएन्टला मोठे अडथळे पार करूनच यावे लागेल. परंतु जर आपण सर्व रेस्टॉरंट्स, शाळा, सार्वजनिक वाहतूक आदी सुरू करून विषाणूला आव्हानच दिले आणि मास्क वापरणे बंद केले तर नवीन उत्परिवर्तन करण्याचा प्रयत्न विषाणू नक्की करेल. नवीन प्रतिरूप हे डेल्टापेक्षा अधिक धोकादायक असू शकेल आणि मग आपल्याला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.

संसर्गग्रस्त लोकांचे व्यवस्थित आयसोलेशन करण्यात आले, तर नवा म्यूटंट धोकादायक असूनसुद्धा अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि आयसोलेट केलेल्या लोकांपुरताच त्याचा ‘अवतार’ मर्यादित राहील. अशा प्रकारे आपणच विषाणूवर हल्ला करणे आवश्यक असते. उत्परिवर्तन हे त्याचे सर्वांत मोठे शस्त्र आहे आणि तेच विकसित होऊ न देता आपल्याला त्याच्या क्षमतेचा मुकाबला करावा लागेल.चाचण्या आणि विलगीकरण (आयसोलेशन) ही विषाणूविरुद्धची मोठी दोन शस्त्रे आहेत. ती व्यवस्थित वापरली तर आपण विषाणूचे योग्य व्यवस्थापन करू शकू. आता आपल्याला विषाणूबाबतची अधिक माहिती आहे आणि सुविधाही आपल्याकडे चांगल्या आहेत. त्यामुळेच दुस-या लाटे-सारखी मोठी आपत्ती पुन्हा येण्याची चिन्हे फारशी दिसत नाहीत. (लेखक हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर आणि मोलीक्युलर बायोलॉजीचे संचालक आहेत.)

डॉ. राकेश मिश्रा,
हैदराबाद

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty + nineteen =

Close