July 1, 2022

तालिबान्यांच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली

Read Time:4 Minute, 7 Second

काबूल : अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणारे तालिबानचे उपनेते मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतला. कतारची राजधानी दोहा येथे संघटनेच्या इतर नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तो गेला होता. मुल्ला बरादर अफगाणिस्तानातील २० वर्षांच्या युद्धाचा विजेता म्हणून उदयास आला आहे. त्याला तालिबानचा नायक मानले जाते. बरादर अफगाणिस्तानचा पुढील राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, अशी चर्चा देखील सुरू आहे.

बरदार सध्या दोहा येथे तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख आहे. तालिबानचा सहसंस्थापक आणि मुल्ला उमरचा सर्वात विश्वासू कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादरला २०१० मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे अटक करण्यात आली होती. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानंतर आणि तालिबानशी झालेल्या करारानंतर पाकिस्तानने २०१८ मध्ये त्याला सोडले. १९६८ मध्ये अफगाणिस्तानच्या उरुझगान प्रांतात जन्मलेला बरादार सुरुवातीपासूनच धार्मिक कट्टर होता. तो तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मेहुणा आहे. बरादार १९८० च्या दशकात सोव्हिएत युनियनविरुद्ध लढला. १९९२ मध्ये रशियन सैन्याला हाकलल्यानंतर अफगाणिस्तान देशाच्या प्रतिस्पर्धी सरदारांमधल्या गृहयुद्धात अडकला होता. त्यानंतर बरादरने कंदहारमध्ये त्याचा माजी कमांडर आणि मेहुणा मुल्ला उमरसोबत मदरसा स्थापन केला. यानंतर मुल्ला उमर आणि मुल्ला बरादर यांनी तालिबानची स्थापना केली.

तालिबानविरोधी नेत्या सलिमा माझरी ताब्यात
तालिबानविरोधात हातात शस्त्र घेणा-या महिला नेत्या सलिमा माझरी यांना ताब्यात घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेव्हा बहुतांश अफगाणी नेत्यांनी देशातून पळ काढला. त्यावेळी बल्ख परिसरात सलिमा तालिबानशी लढण्यासाठी खंबीरपणे उभ्या होत्या. सलिमा या अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गव्हर्नर आहेत. तालिबान्यांनी त्यांना बल्ख प्रांतामधून ताब्यात घेतले.

गनींचा यूएईत आश्रय
अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता ते संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. तालिबानच्या हाती सोडून गेल्याने गनी यांच्यावर अफगाणिस्तानची जनता प्रचंड नाराज आहे.

जलाबाबादमध्ये तालिबानचा गोळीबार
अफगाणिस्तानमधील जलालाबादमध्ये तालिबानींनी गोळीबार केला. स्थानिक नागरिकांकडून सरकारी कार्यालये व इतर ठिकाणी अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज ठेवण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठा जमाव होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर न जाण्यासाठी तालिबानींनी गोळीबार केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

six + 11 =

Close