
तामसा येथे भर दिवसा घर फोडी; साडेचार लाखाचा ऐवज लंपास
तामसा : तामसा येथील दिवसा चो-यांचे सत्र चालूच असून सोमवारी अज्ञात चोरट्यांनी व्यापाराचे घर फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.
येथील व्यापारी अर्जुन बोंबले हे कुटुंबियासह सोमवारी सकाळी लग्नासाठी सावरगाव माळ (ता. हदगाव) येथे गेले होते. घरी कोणीच नसल्याचे हेरून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप फोडून घरातील कपाटामधील अंदाजे दोन लाख रुपये रोख व अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.
दुपारी चारच्या सुमारास शेजा-यांना बोंबले यांचे दार उघडे असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. सायंकाळी घरी आल्यानंतर बोंबले कुटुंबीय घरफोडीमुळे हादरले. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे, फौजदार बालाजी किरवले, जमादार पंडित कल्याणकर यांनी घटनाघर गाठले. घराची पाहणी केल्यानंतर कपाट फोडून रोख रकमेसह दागिने चोरट्यांनी गायब केले. या घटनेमुळे परिसर व शहरात खळबळ उडाली आहे. सततच्या वाढत्या चोर्यामुळे पोलिसांचा वचक कमी होऊन चोरटे दिवसा व रात्री बिनधास्त चो-्या करीत असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन टिका वाढत आहे. या चोरीनंतर रात्री उशिरा तक्रारीनंतर गुन्हा नोंद होणार आहे.