
तात्पुरता युद्धविराम?
रशिया-युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू असून, रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह आणि मोठे शहर खार्कीव्हसह अन्य मोठ्या शहरांत जोरदार हल्ले चढविल्याने शहरे बेचिराख झाली आहेत. दरम्यान, चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर गुरुवारी चर्चेची दुसरी फेरी पार पडली. या फेरीत तात्पुरता युद्धविराम करण्याची शक्यता तपासण्यावर मतैक्य झाले. युद्धभूमीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तात्पुरता युद्धविराम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्त तरी हल्ले थांबू शकतात.
रशिया-युक्रेन यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर गुरुवारी बेलारुसमध्ये चर्चेची दुसरी फेरी पार पडली. मात्र, युक्रेनने प्रथम बेलारुसमध्ये चर्चेस नकार दिला होता. त्यानंतर युक्रेनियन शिष्टमंडळ बेलारूसमध्ये हेलिकॉप्टरने पोहोचले. त्यानंतर उशिरा चर्चा सुरू झाली. युक्रेनने युद्ध थांबविण्यासह ३ अटी रशियासमोर ठेवल्या. त्यानंतर रशियानेही काही अटी समोर ठेवल्या. या चर्चेदरम्यान तात्पुरत्या युद्धविरामावर मतैक्य झाले.
त्यामुळे तूर्त युद्ध थांबण्याची शक्यता आहे. युद्धभूमीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तूर्त युद्धविराम होणार आहे. त्यामुळे युद्धात होरपळणा-यांना तूर्त दिलासा मिळणार आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर रशियाने कीव्हबरोबरच खार्कीव्ह आणि अन्य मोठ्या लोकसंख्येच्या शहरांना लक्ष्य करीत हल्लासत्र तीव्र केले. खार्कीव्हमधील पोलिस आणि गुप्तवार्ता विभागाच्या मुख्यालयावर बुधवारी बॉम्बहल्ला करण्यात आला. पंधरा लाख लोकसंख्येच्या या शहरातील निवासी भागांवर हल्ले वाढविण्यात आले. तसेच चेर्नीहीव शहरात क्षेपणास्त्र हल्ल्यात एक रुग्णालय उद्ध्वस्त करण्यात आले. येथे झालेल्या हल्ल्यात २२ ठार झाले.
२ हजार नागरिकांचा बळी
रशियाने युक्रेनमध्ये विध्वंसक हल्ले आणखी तीव्र केले. आठवडाभरात शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या असून, २ हजार नागरिकांचा बळी गेल्याची माहिती युक्रेन सरकारने दिली. त्यात दोन्ही देशांच्या मृत सैनिकांचा समावेश केल्यास युद्धबळींचा आकडा वाढणार आहे.