डॉ. सातव विधान परिषदेवर

Read Time:2 Minute, 47 Second

मुंबई : भाजपाच्या संजय केनेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी डॉ. सातव यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. कॉंग्रेस नेते दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनाने त्यांच्याच पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर घेऊन राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्वाची संधी दिली.

काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी येत्या २९ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार होती. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांना तर काँग्रेसने दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली होती. डॉ. सातव यांना महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. विधानसभेतील महाविकास आघाडीचे संख्यबळ लक्षात घेता काँग्रेस उमेदवाराला निवडून येण्यात अडचण नव्हती.

दरम्यान, निवडणूक टाळण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन भाजपचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करत भाजपने संजय केनेकर यांचा अर्ज आज शेवटच्या दिवशी मागे घेतला. त्यामुळे डॉ. प्रज्ञा सातव यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आदींनी बिनविरोध निवडीबद्दल डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

ten − 7 =