
डॉ. प्रज्ञा सातव यांची निवड बिनविरोध?
विधानपरिषदेसाठी भाजपचे पाच उमेदवार जाहीर
मुंबई : भाजपने विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यात नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली असून मुंबईत राजहंस सिंह यांना उमेदवारी देत नवी राजकीय खेळी भाजपने खेळली आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांच्या विरोधात भाजपने उमेदवार जाहीर न केल्याने त्यांची निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची निश्चिती केली आहे. ही नावे आज जाहीर करण्यात आली आहेत. त्यात मधल्या काळात पक्षात नाराज असलेले माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पारड्यात उमेदवारी टाकण्यात आली आहे. बावनकुळे यांना नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पक्षाने निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपने अमल महाडिक यांना उमेदवारी दिली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आग्रहावरून ही उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हापुरात मंत्री सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांनी आपला अर्जही भरलेला आहे. त्यात महाडिक-पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाचा पूर्वेतिहास पाहता ही लढत सर्वात लक्षवेधी आणि तुल्यबळ ठरण्याची शक्यता आहे. धुळे नंदुरबार मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार व माजी मंत्री अमरिष पटेल यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे तर अकोला-वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात वसंत खंडेलवाल हे भाजपचे उमेदवार असणार आहेत.
मुंबईत राजहंस सिंह यांना उमेदवारी
काँग्रेसमधून भाजपात आलेले राजहंस सिंह यांना मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. राजहंस यांचा मुंबई उपनगरात राहणाºया उत्तर भारतीय मतदारांमध्ये मोठा प्रभाव असून आगामी महापालिका निवडणुका डोळयापुढे ठेवून भाजपने राजहंस यांच्या पारड्यात उमेदवारी टाकल्याचे दिसत आहे. या जागेसाठी चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होती. मात्र राजहंस यांनी उमेदवारी मिळवून बाजी मारली आहे.