डिजीटल शेती तंत्रज्ञानात नाहेप प्रकल्प देशात नेतृत्व करेल

Read Time:4 Minute, 18 Second

परभणी/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील ७० टक्के लोकसंख्‍या आजही शेतीवर अवलंबुन आहे. मनुष्‍याच्या जीवनातील प्रत्‍येक क्षेत्र डिजिटल तंत्रज्ञानाने व्‍यापले जात आहे. शेतीतील अनेक कष्‍टप्रत कामे डिजिटल तंत्रज्ञानाने सोपी होऊ शकतात. हे डिजिटल तंत्रज्ञान शेतकरी बांधवाना वापरण्‍याकरिता सोपे व किफायतशीर झाले पाहिजे. डिजिटल तंत्रज्ञानामध्‍ये कुशल मनुष्‍यबळ निर्मितीत नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन देशात परभणी कृषि विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. भविष्‍यात डिजिटल शेतीकरिता नाहेप प्रकल्‍प देशात नेतृत्‍व करेल, असे प्रतिपादन नांदेड येथील स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) च्‍या वतीने दि.१४ ते १६ मार्च दरम्‍यान शेती स्‍वयंचलनातील प्रगत डिजिटल तंत्रज्ञान यावर आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले असुन या कार्यशाळेचे उदघाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्‍हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ.अशोक ढवण तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन अहमदाबाद येथील अंतराळ उपयोग केंद्राचे अंतराळ शास्‍त्रज्ञ डॉ.राहुल निगम आणि राष्ट्रीय समन्‍वयक डॉ.प्रभात कुमार उपस्थित होते. व्‍यासपीठावर अमेरिकेतील मेरिलँड विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ डॉ.रघु मुरदुगुड्डे, आयआयटी मुंबईचे शास्‍त्रज्ञ डॉ.पेनन चिन्‍नास्‍वामी, डॉ.धर्मराज गोखले, डॉ.दत्‍तप्रसाद वासकर, डॉ.देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ.धीरजकुमार कदम, नाहेप प्रकल्‍प मुख्‍य अन्‍वेषक डॉग़ोपाल शिंदे, आयोजन सचिव डॉक़ैलास डाखारे आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात इस्‍त्रो शास्‍त्रज्ञ डॉ.राहुल निगम म्‍हणाले की, शेतीत मजुरीवर मोठया प्रमाणात खर्च होत असुन किड व रोगाच्‍या प्रादुर्भावामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होते. या समस्‍यावर डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतीत स्‍वयंचलनाद्वारे मात करू शकतो. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी पाण्‍यावर तग धरणा-या पिकांच्‍या जाती विकसित करणे शक्‍य आहे. कृषिच्‍या विद्यार्थ्यांनी नोकरदार होण्‍यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बना, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. सुत्रसंचालन डॉ.विणा भालेराव यांनी तर आभार डॉ. सुनिता पवार यांनी मानले. देशातील विविध विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

seven + seven =