टोमॅटो उत्पादक शेतक-यांना एकरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्या

Read Time:3 Minute, 18 Second

लातूर : प्रतिनिधी

टोमॅटोचे दर कमी झाल्याने महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतक-यांना टोमॅटो रस्त्यावर फेकुन द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने टोमॅटो उत्पादक शेतक-यांना एकरी किमान ५० हजार रुपयाचे अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या टोमॅटोचे दर
मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. सध्या मार्केट मध्ये चांगल्या दर्जाच्या टोमॅटोच्या २५ ते ३० किलोच्या कॅरटला ८० ते १०० रुपयांचा भाव मिळत आहे. म्हणजेच २ ते ३ रुपये किलो असा भाव शेतक-यांना मिळत आहे. टोमॅटोचा एकरी उत्पादन खर्च हा १ लाख रुपयांच्या जवळपास असल्याने उत्पादन खर्च तर लांबच सध्याच्या भावात वाहतूक व तोडणीचा खर्चही निघत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळेच बहुतांश शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहेत अथवा गुराढोरांना खायला टाकत आहेत.

अशावेळी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या टोमॅटो उत्पादक शेतक-यांच्या पाठीशी राज्य सरकारने उभे टाकले पाहिजे. टोमॅटो उत्पादक शेतक-यांचे पंचनामे करून त्यांना एकरी किमान ५० हजार रुपयांची मदत शासनाने देऊन त्यांना दिलासा दिला पाहिजे. तसेच पणन मंडळाच्या माध्यमातून सरकारने प्रति किलो १० रुपये दर निश्चित करून मागणी असलेल्या राज्याबाहेरील बाजार समित्यांमध्ये टोमॅटो पाठवावे. जेणेकरून दरामध्ये सुधारणा होईल. राज्यात टोमॅटो उत्पादक शेतक-यांवर एवढे मोठे संकट आलेले असताना राज्य सरकार काहीच मदत शेतक-यांना करत नाही अथवा या प्रश्नावर बोलतही नाही हे न उलगडणारे कोडे आहे.

या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून राज्य सरकारने त्वरित टोमॅटो उत्पादक शेतक-यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी टोमॅटो फेकोआंदोलन करेल याची नोंद घ्यावी, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

14 − three =