टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात कोरोनाचा उद्रेक

Read Time:6 Minute, 5 Second

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथील एका शिक्षकासह १९ विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी केलेल्या चाचणीमध्ये याच विद्यालयातील आणखी ५२ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पारनेरचे तहसीलदार आवळकंठे यांनी दिली. दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नवोदय विद्यालय परिसराची पाहणी केली.

नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुरुवारी कोरोनासारखी लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे त्यांची टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आले. त्यानंतर शुक्रवारी काही विद्यार्थ्यांची तपासणी केली असता दहा विद्यार्थी व एक संगीत शिक्षक बाधित आढळून आले. त्यामुळे बाधित विद्यार्थी व शिक्षक यांना पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य विभागाने उपचारासाठी दाखल केले आहे.नवोदय विद्यालयातील इतर ४१० विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र विद्यालयाने त्यांना शाळेतच ठेवले असून त्यांची काळजी घेण्यात येत आहे.

दरम्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी २७ विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली तर शनिवारी आणखी २५ विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. पहिल्या दिवशी १९ आणि रविवारी मिळालेल्या अहवालात ५२ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण विद्यार्थ्यांची संख्या ७१ इतकी झाली आहे. दरम्यान विद्यालयांमध्ये उपाययोजना तातडीने राबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले हे रविवारी दुपारी नवोदय विद्यालयाला भेट देऊन पाहणी करणार आहेत.

नाशिक महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २५० बाधित
नाशिकमध्ये सध्या कोरोनाच्या ४४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक २५० रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रात आहेत, तर निफाडमध्ये ४७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. ओमिक्रॉनची भीती पाहता नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क लावणे आणि एकाच ठिकाणी जास्त गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मास्क हेच शस्त्र
महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषत: प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सोबतच मास्क न घालणा-यांवर पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली आहे. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही.

अकोल्यात ओमिक्रॉनचा शिरकाव
दुबईतून अकोल्यात आलेल्या त्या युवतीचा ‘ओमिक्रॉन’ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिला गृहविलगीकरणातच ठेवण्यात आले आहे. अकोल्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने नागरिकांनी आतातरी कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

आरोग्य यंत्रणांची पूर्णपणे तयारी : उपमुख्यमंत्री
ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग राज्यात वाढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली. तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोस देता येऊ शकतो, असे सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणांची पूर्णपणे तयारी आहे, असे पवार म्हणाले. भविष्यात असे काही घडू नये, पण घडलेच तर, ऑक्सिजन निर्मितीबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले होते की, तुम्हाला जेवढा ऑक्सिजन लागेल, त्याच्या तिप्पट तुमची तयारी ठेवा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + seventeen =