January 21, 2022

झोपेच्या, नशाकारक गोळ्या चक्क पान स्टॉलवर

Read Time:5 Minute, 9 Second

लातूर : येथील औसा रोडवरील कश्मीर पानस्टॉलवर चक्क झोपेच्या, नशाकारक गोळ्या विनापरवाना विकल्या जातात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सदर पानस्टॉलवर छापा टाकला असता तेथे स्लिपर्झ-०.५ नावाच्या ६०० गोळ्या आढळून आल्या. पोलिसांनी २१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने दि. १ ऑक्टोबर रोजी अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम त्यांचे पानपट्टीमधून अवैधरित्या, विनापरवाना झोपेच्या गोळ्यांची अवैधपणे विक्री करीत आहेत. ही खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांसह औसा रोडवरील कश्मीर पानस्टॉल नावाच्या पानपट्टीवर छापा मारला. पंचा समक्ष झडती घेतली असता सदर पानस्टॉलमध्ये स्लिपर्झ-०.५ नावाच्या एकूण ६०० गोळ्या आढळून आल्या. सदरच्या गोळ्या या झोपेसाठी वापरण्यात येतात. ते अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगी, परवान्याशिवाय व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकता किंवा खरेदी करता येत नाहीत, असे असतानाही त्या पानपट्टी मधून सदरच्या गोळ्यांची विक्री होत असल्याचे आढळून आले.

पानटपरीतील जावेद रुकमोद्दिन शेख व नसीर अल्लाउद्दिन शेख तसेच गोळ्या पानपट्टीमधून विक्रीसाठी देणारा एक इसम अशा तीन इसमा विरुद्ध पोलीस ठाणे, विवेकानंद चौक येथे पोलीस उपनिरीक्षक गळगट्टे यांचे फिर्याद वरून आमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व त्या अंतर्गत नियम १९४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद रुकमोद्दिन श्ेख व नसीर अल्लाउद्दिन शेख दोघे राहणार चांडेश्वर ता. लातूर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील अवैध विक्रीसाठी आणलेल्या गोळ्या व मोबाईल असा एकूण २१ हजार ३५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील सपोनि खंदारे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे नेतृत्वात विशेष पथकातील पोलीस अंमलदार सफौ वाहिद शेख, रामचंद्र ढगे, महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के तसेच अन्न व औषध विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन बुगड, पोलीस स्टेशन विवेकानंदचे पोलीस उपनिरीक्षक महेश गळगट्टे यांनी सहभाग नोंदविला.

कर्नाटकातून आणल्या गोळ्या
पानपट्टीमध्ये बसलेले दोन इसमाना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव जावेद रुकमोदिन शेख, वय २९ वर्ष, नसीर अल्लाउद्दीन शेख, वय ३१ वर्ष, राहणार चांडेश्वर तालूका लातूर असल्याचे सांगून त्यांना सदरचे गोळ्या विकणे बाबतचा परवाना आहे का? असे विचारले असता त्यांनी सदरच्या गोळ्या विकण्याचा कसल्याही प्रकारचा परवाना त्यांच्याकडे नसल्याचे सांगितले. तसेच सदरचे गोळ्या कर्नाटक राज्यातील एका व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + sixteen =

Close