August 19, 2022

झाडे वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे सरसावले

Read Time:4 Minute, 8 Second

वाटुर फाटा ते जिंतूर राज्य रस्त्याच्या रुंदीकरणात तोडल्या जाणारी झाडे वाचविण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सयाजी शिंदे सरसावले असून शक्य तेवढ्या झाडांचे पूनर्रोपण करण्यासाठी दोन दिवसांपासून तीव्र उन्हात ते ठान मांडून आहेत.

वाटूरफाटा ते जिंतूर या राज्य रस्त्याच्या रुंदीकरणात रस्त्याच्या दुतर्फा असलेली वड, कडुनिंब, जांभूळ आदी जुनी झाडे सरसकट तोडल्या जाणार आहेत. या राज्य रस्त्यावर चारठाणा ते देवगावफाटा दरम्यान वडाचे अनेक महाकाय वृक्ष असून त्यांची संख्या मोठी आहे. ही झाडे तोडली जाणार असल्याने आपल्या परिसरातील निसर्गाचा हा ठेवा कायमस्वरूपी नष्ट होणार असल्याने नाराज झालेल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध प्रकारे सोशल मिडियाद्वारे या प्रश्नाला वाचा फोडली होती.

याबाबत चारठाणा गावातील संदीप देशमुख, अलकेश हिरप, मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य, जिंतूर येथील झाड फौंडेशनचे प्रा.श्रीधर भोंबे, अ‍ॅड.मनोज सारडा, डॉ.दुगार्दास कान्हडकर यांनी पुढाकार घेत रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्याशी चर्चा करून शक्य तेवढी झाडे वाचविण्याबाबत प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही बाब अभिनेते सयाजी शिंदे यांच्यापर्यंत पोहचली असता त्यांनी तात्काळ चारठाणा येथे धाव घेऊन सर्व वृक्षप्रेमी नागरिकांशी चर्चा केली. झाडे तोडण्याऐवजी ज्या झाडांचे प्रत्यारोपण करणे शक्य आहे तेवढे करण्याचा प्रयत्न करू असा शब्द उपस्थितांना दिला. केवळ शब्द देऊनच सयाजी शिंदे थांबले नाहीत तर चार दिवसातच सर्व नियोजन लावून गणेशपूर मंदिराजवळील दोन झाडे प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया त्यांनी मंगळवार, दि.१० पासून सुरू केली आहे. एवढ्या रखरखत्या उन्हात सुद्धा कालपासून अभिनेते सयाजी शिंदे स्वत: या कामावर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान अभिनेते सयाजी शिंदे यांनी वाटुर ते चारठाणा या रस्त्यावरील वडाच्या एकूण झाडांची संख्या विचारणा केली असता २७ किमीच्या या रस्त्यावर वडाची केवळ ९० झाडे असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मात्र काही सजग नागरिकांनी चारठाणा ते गणेशपूर फाटा या ३ किमी रस्त्यावरच दुतर्फा वडाची ९७ झाडे असून गणेशपूरच्या पुढे १०० च्या वर झाडे असल्याची बाब सयाजी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. कंत्राटदार, शासन सह्याद्री देवराई व लोकसहभाग यांच्या सहकार्यातून जेवढी झाडे वाचवणे शक्य होईल तेवढी वाचवायचा प्रयत्न करायचा आहे. टोकाची भूमिका घेऊन किंवा ताणून काहीच साध्य होणार नसल्याचे सयाजी शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

11 + 8 =

Close