
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन लसीचे भारतात उत्पादन?
अमेरिकेत वापरास परवानगी मिळालेल्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या लसीचे भारतात उत्पादन करण्याबाबत अमेरिकेकडून प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहिती अमेरिकेचे गृहसचिव डॅनियल स्मिथ यांनी दिली आहे. भारतातील लस उत्पादक आणि अमेरिकी कंपन्या यांच्यामार्फत संयुक्तपणे या लसीचे उत्पादन करता येणे शक्य आहे का? याची चाचपणी सध्या सुरू केल्याचीही माहिती त्यांनी दिली.
भारतात सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेने धुमाकूळ घातला आहे. काही महिन्यांतच तिसरी लाटही अटळ असल्याचे चं तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गरज व्यक्त केली जात आहे. मात्र भारतात सध्याच लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक प्रकारच्या लसी उपलब्ध होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. त्या पार्श्वभुमीवर अमेरिकेनेही एक पाऊल पुढे टाकले आहे.
स्मिथ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन भारतातील लस उत्पादनात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या लसीच्या उत्पादनासाठी या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. भारतातील खासगी क्षेत्रामधील कंपन्यांशी त्यासंदर्भात बोलणी सुरू आहेत. बोलणी सकारात्मक झाल्यास लसीचे उत्पादन अधिकाधिक वेगाने करता येणे शक्य आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२२ च्या अखेरपर्यंत भारतात १०० कोटी लसींच्या डोसचे उत्पादन होऊ शकेल, अशी माहितीही स्मिथ यांनी दिली.
भारताला कच्चा माल पुरवणे अवघड
दरम्यान, लसींच्या उत्पादनासाठी भारताला कच्चा माल पुरवणे सोपे काम नसल्याचेही स्मिथ यांनी यावेळी सांगितले. काही दिवसांपूर्वी सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी अमेरिकेने लसीच्या उत्पादनासाठीचा महत्त्वाच्या कच्च्या मालाचा पुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर स्मिथ यांनी अमेरिकेची भुमिका मांडली.जागतिक स्तरावरच कच्च्या मालाची पुरवठा साखळी विस्कळीत होऊ लागल्यामुळे हे सोपे नाही, असे त्यांनी सांगितले.
कच्च्या मालाची समस्या जागतिक
भारत सरकारने कच्च्या मालाची यादी दिली आहे. अमेरिका या मालाचा आणि इतर साधनांचा पुरवठा तातडीने करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, जागतिक स्तरावरच कच्च्या मालाची पुरवठा साखळी विस्कळीत होऊ लागल्यामुळे हे सोपे नाही. आम्ही सध्या भारतासोबत या यादीवर काम करत आहोत. आमच्याकडे काय उपलब्ध आहे, काय आम्ही पुरवू शकतो आणि किती वेगाने त्याचा पुरवठा करता येऊ शकेल यावर आम्ही काम करत आहोत. कच्च्या मालाच्या पुरवठ्याची समस्या जगातील सर्वच लसींच्या बाबतीत आहे, असेही त्यांनी सांगितले.