जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन पावडरवर अखेर बंदी

Read Time:4 Minute, 6 Second

पावडरमध्ये आढळले दोष, कंपनीचा परवाना रद्द

मुंबई : लहान मुलांसाठी देशभरात वापरल्या जाणा-या जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीच्या पावडरवर बंदी घालण्यात आली आहे. या पावडरमध्ये दोष आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कंपनीचा थेट परवानाच रद्द करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेतला.

जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीच्या पावडरला देशभरात प्रचंड मागणी आहे. घराघरात प्रत्येक लहान मुलांसाठी हे पावडर वापरले जाते. गेल्या काही दिवसांत या पावडरमध्ये दोष असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अमेरिकेतही या पावडरवर बंदी आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या पावडरची चाचणी भारतात केली. कोलकाताच्या प्रयोगशाळेत चाचणी केली गेली. त्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये दोष आढळले आहेत. त्यामुळे राज्याच्या अन्न आणि ओषध प्रशासनाने कंपनीचा थेट परवाना रद्द केला.

२०२३ पासून विक्री बंद
जॉन्सन ऍण्ड जॉन्सन हे नाव बेबी प्रॉडक्टसशी गेली कित्येक वर्षे जोडले गेले आहे; पण आता २०२३ पासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जगभरातील टॅल्क बेस्ड बेबी पावडरची विक्री पूर्णपणे बंद करणार आहे. या कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या हजारो कन्झ्युमर सेफ्टी केसेसमुळे या प्रॉडक्टसची विक्री बंद करणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली.

अमेरिकेत आढळला
धोकादायक फायबर
२०२० मध्ये कंपनीने अमेरिका आणि कॅनडामध्ये पावडरची विक्री बंद केली होती. या पावडरमध्ये ऍस्बेटॉसचा एक धोकादायक फायबर आढळला होता. हा फायबर कॅन्सर होण्यास कारणीभूत असल्याचे मानले जात होते. या प्रकरणी ३५ हजार महिलांनी गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या आरोपावरून कंपनीवर खटला दाखल केला होता. त्यामुळे अमेरिकेत जॉन्सनच्या प्रॉडक्ट्सची मागणी कमी झाली होती. विक्री कमी झाल्याच्या कारणावरून कंपनीने २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये बेबी पावडरची विक्रीच बंद केली होती.

अमेरिकेत कंपनीला दंड
जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन पावडरमुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या कारणावरून अमेरिकेतील एका कोर्टाने कंपनीला १५ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. कंपनीने लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ केला आहे, असा ठपका कोर्टाने ठेवला होता. या प्रॉडक्ट्समध्ये ऍस्बेस्टॉस मिसळत असल्याचा आरोपही कंपनीवर करण्यात आला होता.

१९८४ पासून पावडरची विक्री
१९८४ पासून जॉन्सन कंपनी बेबी पावडरची विक्री करते. फॅमिली फ्रेंडली असल्याचे दाखवल्याने ही पावडर म्हणजे कंपनीचे सिंबॉल प्रॉडक्ट बनले होते. १९९९ पासून कंपनीच्या इंटर्नल बेबी प्रॉडक्ट डिव्हिजनच्या वतीने याचे मार्केटिंग रिप्रेझेंटेशन केले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 + nine =