
जेईई मेनची परीक्षा लांबणीवर…
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे जेईई मेनची चौथ्या टप्प्यात होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. यंदाची परीक्षा ४ टप्प्यांमध्ये नियोजित होती. त्यापैकी २ टप्प्यांमधील परीक्षा पार पडली होती. तिस-या टप्प्यातील परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती आणि आता चौथ्या टप्प्यातील परीक्षाही स्थगित करण्यात आली आहे. यासंबंधीचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतला असून, या परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल निशंक यांनी दिली.
यंदाच्या वर्षी जेईई मेन ही परीक्षा ४ टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २३ ते २६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान या परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला, तर दुसरा टप्पा १६ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत पार पडला. तिस-या टप्प्यातील परीक्षा २७, २८ आणि ३० एप्रिल २०२१ दरम्यान होणार होती. मात्र, देशातील कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता चौथ्या टप्प्यातील परीक्षेलाही स्थगिती देण्यात आली आहे. २४ ते २८ मे २०२१ या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार होती.
या चौथ्या टप्प्यातील परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून त्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना अगोदर दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये होणारी तिस-या टप्प्यातील जेईई मेन परीक्षा स्थगित झाल्यानंतर चौथ्या टप्प्यातील परीक्षेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, चौथ्या टप्प्यातील परीक्षाही स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.