May 19, 2022

जूनमध्ये मिळणार १२ कोटी डोस

Read Time:4 Minute, 42 Second

दिल्ली : मागच्या साडेचार महिन्यांत जेवढे लसीकरण झाले, त्याच्या ६० टक्के लसीकरण एकट्या जूनमध्ये होणार आहे. कारण जूनमध्ये १२ कोटी लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. या लस पुरवठ्याच्या वेळेचा तक्ता राज्यांना पाठविला असून, त्यानुसार राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यंदा १६ जूनपासून सुरू झालेल्या लसीकरणात आतापर्यंत २१ कोटी डोस दिले गेले आहेत.

मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये दीडपट लस उपलब्ध करून दिली जाणार आहे, तर जुलैमध्ये दुप्पट लस उपलब्ध करून दिल्या जातील. मे महिन्यात ७ कोटी ९४ लाख लस उपलब्ध करून दिल्या. आता जूनमध्ये ११ कोटी ९६ लाख डोस उपलब्ध होतील. ३१ जुलैपर्यंत ५१.६ कोटी डोसच्या हिशेभाने जुलै महिन्यात १८ कोटी डोस उपलब्ध होतील. या हिशेबाने जून महिन्यात प्रतिदिन ४० लाख डोस द्यावे लागतील, तर जुलैमध्ये प्रतिदिन ६० लाख डोस देता येईल, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठे हत्यार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. देशात तिस-या टप्प्यातील लसीकरण मोहीम १ मे पासून सुरू झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशात २०.८६ कोटी कोरोना लसींचे डोस दिले गेले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अजूनही १.८२ कोटी लसींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. तसेच पुढच्या तीन दिवसांत ४ लाखांहून अधिक डोस मिळतील, असे सांगण्यात आले.

केंद्राने जाहीर केलेल्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात ५० टक्के लसी केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जातात. या लसी राज्यांना विनामूल्य पुरवल्या जातात. उर्वरित ५० टक्के लसी राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या धोरणानुसार केंद्र सरकारने राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना आगाऊ माहिती दिली आहे. देशात सध्या कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक व्ही या लसी उपलब्ध आहेत.

देशात ६.३ टक्के लसी वाया
झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांव्यतिरिक्त तामिळनाडू, जम्मू-काश्मीर आणि मध्य प्रदेशात लस वाया घालवण्याचे प्रमाण अधिक आहे. तामिळनाडूत १५.५ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये १०.८ टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये १०.७ टक्के इतक्या लसी वाया गेल्या आहेत. एकूण देशाचा विचार केला तर आतापर्यंत देशात ६.३ टक्के लशी वाया गेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली.

सीरम पुरविणार १० कोटी कोविशिल्ड
जून महिन्यात आम्ही १० कोटी कोविशिल्ड व्हॅक्सिनची निर्मिती करत पुरवठा करणार आहोत. मे महिन्यात ६.५ कोटी डोसची निर्मिती करून पुरवठा केला होता. सीरम इन्स्टिट्यूट देशातील नागरिकांची काळजी घेण्यास कटिबद्ध आहे, असे कंपनीच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमारसिंह यांनी दिलेल्या पत्रात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 + 10 =

Close