
जुलैमध्ये खाद्य तेलाचे दर ५२ टक्क्यांनी वाढले
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर उच्चांकावर पोहोचलेले असतानाच खाद्यतेलाचाही भडका उडालेला आहे. खाद्यतेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. एकट्या जुलै महिन्यातच तब्बल ५२ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे नागरिकांधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
खाद्यतेलाच्या दरात एकट्या जुलै महिन्यात ५२ टक्के वाढ झाल्याची माहिती केंद्रीय अन्न व ग्राहक राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी दिली. मागच्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत या वर्षीच्या जुलै महिन्यात ही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार खाद्यतेल आणि डाळींच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही चौबे यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या तुलनेत यंदा शेंगदाण्याच्या तेलाच्या दरात १९.२४ टक्के वाढ झाली आहे. मोहरीचे तेल ३९.०३ टक्के, वनस्पती तुपात ४६.०१ टक्के, सोयाबीनच्या तेलात ४८.०७ टक्के, सूरजमुखी तेलात ५१.६२ टक्के आणि पामतेलात ४६.४२ टक्के वाढ झाल्याने तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. दरम्यान, तेलाचे दर कमी करण्यासाठी आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे, असे चौबे यांनी सांगितले. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर आणखी वाढल्याने आयात शुल्क कमी करूनही भारतात ग्राहकांना लाभ झालेला नाही. त्यामुळे नागरिकांधून नाराजी व्यक्त होत आहे.