जुलैअखेर लहान मुलांना लस!

Read Time:3 Minute, 15 Second

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यातच आता कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. याबाबत आयसीएमआरने एक अभ्यास केला असून, त्यात देशात कोरोनाची तिसरी लाट उशिराने येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सरकारला लसीकरण करण्यासाठी ६ ते ८ महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे लसीकरणाला वेळ मिळणार आहे. त्यातच जायडस कॅडिलाने मुलावरील लसीची चाचणी जवळपास पूर्ण केली आहे. त्यानुसार जुलै अखेरीस मुलांचेही लसीकरण सुरू होऊ शकते, असे कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले.

केंद्र सरकारने लसीकरणाला वेग देण्याची भूमिका घेतली आहे. आगामी दिवसांत रोज १ कोटी नागरिकांना डोस देण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. लसीकरण वेगाने झाल्यास कोरोनाला रोखणे शक्य आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, जायडस कॅडिलाने मुलांवरील लसीची चाचणी जवळपास पूर्ण केली आहे. यानुसार आपण जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टमध्ये १२ ते १८ वर्षांदरम्यानच्या मुलांचे लसीकरण सुरू करू शकू, असे अरोरा यांनी सांगितले. तिस-या लाटेला डेल्टा प्लस वेरियंट कारणीभूत ठरेल का, हे आताच सांगणे अवघड आहे. महारमारीचा लाटेचा संबंध हा नवीन वेरिएंट किंवा नव्या स्ट्रेनशी असतो. यामुळे यानेही लाट येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

फुफ्फुसात घट्ट चिकटतो डेल्टा प्लस
कोरोनाचा डेल्टा प्लस वेरिएंट हा फुफ्फुसातील पेशींना घट्ट चिकटतो. पण या वेरिएंटमुळे गंभीर आजार होतो किंवा वेगाने पसरतो, अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा व्हायरस किती मोठे नुकसान करेल, हे अधिक रुग्ण समोर आल्यावरच ठोसपणे सांगता येईल. पण कोरोनावरील लसीचा एक किंवा दोन डोस घेणा-यांना या वेरिएंटचा संसर्ग झाल्यास तो सौम्य असेल, असेही अरोरा यांनी सांगितले.

लसीकरण तिसरी लाट रोखू शकेल
देशात सुरू असलेली लसीकरण मोहीम तिस-या लाटेचा परिणाम कमी करण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल. कोरोनाची तिसरी लाट ही दुस-या लाटेइतकी गंभीर नसेल, असे आयसीएमआरचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सीमरन पांडा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 1 =